You are currently viewing डिझेल अभावी स्वॅब टेस्ट रखडले….

डिझेल अभावी स्वॅब टेस्ट रखडले….

आमदार नितेश राणे यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावले

कणकवली

कोटींच्या विकासनिधींची बाता मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांना कोरोना टेस्ट साठी स्वॅब ओरोसला नेण्यासाठी गाडीत डिझेल द्यायला जमत नाही. अरे लाज वाटली पाहिजे ठाकरे सरकारला आणि पालकमंत्र्यांना..अशा शब्दांत भाजपा आमदार नितेश राणे यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावले.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातून कोरोना टेस्टसाठी स्वॅब ओरोसला नेण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी स्वखर्चाने डिझेल भरून स्वतः खाजगी गाडी उपलब्ध करून दिली. कोरोना टेस्ट साठी घेण्यात आलेले स्वॅब ओरोसला नेण्यासाठी गाडीत डिझेल नसल्यामुळे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब पडून असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली.

प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिकलगार आणि डॉ. टाक यांच्याकडून धक्कादायक माहिती यावेळी समोर आली. लेखी पत्रव्यवहार करूनही आरोग्य उपसंचालक यांनी निधी उपलब्ध करून दिला नाही. ॲम्ब्युलन्स मध्ये डिझेल भरण्यासाठीही निधी नाहीय. आम्ही स्वतःच्या खिशातून डिझेल भरून पेशंटसाठी ऑक्सिजन आणले. मात्र वरिष्ठांकडून निधी दिला जात नसल्याचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ शिकलगार, डॉ टाक यांनी सांगितले.

डॉक्टरांच्या तोंडून ही भयावह स्थिती ऐकल्यानंतर शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्याच्या बाता मारणारे ठाकरे सरकार, कोटींचा निधी जिल्हा विकासाला आणले म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांनी थोडी तरी लाज बाळगावी, काय चाललंय सिंधुदुर्गात? कोरोना टेस्टसाठी स्वॅब ओरोसला नेण्यासाठी गाडीत डिझेल नाहीय म्हणून स्वॅब जर उपजिल्हा रुग्णालयात पडून असतील तर जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या सत्ताधाऱ्यांचे करायचे काय? असा उद्विग्न सवाल आमदार राणे यांनी केला.

तूर्तास मी स्वखर्चाने जनतेची गैरसोय दूर व्हावी म्हणून डिझेल भरून माझी खाजगी गाडी उपजिल्हा रुग्णालयाला दिली आहे. मात्र कणकवली उपजिल्हा रुग्णालयात मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक निधीबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक डॉक्टरांच्या उपस्थितीत घेणार असल्याचे आमदार नितेश यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, न.पं. बांधकाम सभापती मेघा गांगण, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा