You are currently viewing आला पहिला पाऊस

आला पहिला पाऊस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*आला पहिला पाऊस* 

 

आला पहिला पाऊस

करु तयाचे स्वागत

सरीवरी येति सरी

नाचत बागडत

 

आला पहिला पाऊस

मनी आठवण देतो

हासत लाजत उगा

भिजवत मग येतो

 

आला पहिला पाऊस

रानात साद घालतो

कणकण भिजवत

काळा घन बरसतो

 

आला पहिला पाऊस

मातीला सुगंध येतो

रानामध्ये राघु मैना

आसरा झाडाचा घेतो

 

आला पहिला पाऊस

रिमझिम रिमझिम

मोर पिसारा खुलतो

होतो मग ओला चिंब

 

आला पहिला पाऊस

कोसळती जलधारा

हिरव्या गार रानामध्ये

खट्याळ वाहतो वारा

 

आला पहिला पाऊस

ओले चिंब अंग अंग

मन मोर बहरला

स्पर्शातच होई दंग

 

आला पहिला पाऊस

पापणी मिटता स्पर्शतो

कधी धोधो बरसतो

तनामनात न्हाहतो

 

आला पहिला पाऊस

ढगाचा गडगडाट

नृत्य विजेचे बघुन

पडतो लखलखाट

 

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा