You are currently viewing सिंधुदुर्गात ‘आयएनएस गुलदार’ युद्धनौकेच्या पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

सिंधुदुर्गात ‘आयएनएस गुलदार’ युद्धनौकेच्या पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

भारतातील पहिलाच उपक्रम; सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना मिळणार

सिंधुदुर्ग :

वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक जवळ नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या ‘आयएनएस गुलदार’ या युद्धनौकेचे पाण्याखालील संग्रहालय हा प्रकल्प होणार असून याचा शुभारंभ दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

भारतातील हा पहिलाच उपक्रम असून यामुळे सागरी संवर्धन व पर्यटनाला चालना मिळणार आहे. समुद्रात विराजमान होणाऱ्या जहाजाभोवती प्रवाळ निर्मिती होऊन त्याद्वारे स्कुबा डायव्हिंग व भविष्यात पाणबुडीद्वारे पर्यटन करता येणे शक्य होणार आहे. केंद्र शासनाने ऐतिहासिक पाऊल उचलत भारतीय नौदलाचे निवृत्त जहाज ‘आयएनएस गुलदार’ हे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सुपूर्द केले आहे. जगातील अनेक देशात असे प्रकल्प तयार केले आहेत. हा प्रकल्प तयार करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या मान्यतेने भारतीय नौदलाने निवृत्त युद्धनौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास विना मोबदला उपलब्ध करून दिली आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, दूरदृश्य प्रणालीद्वारे सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर सहभागी झाले.

या जहाजाचे १,१२० टन वजन आहे. तर ८३.९ मोटर लांबी असून ९.७ मीटर रुंदी आहे. ५.२ मीटर इतकी खोली आहे. हे जहाज १२ जानेवारी २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले आहे. या प्रकल्पास केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने २७ डिसेंबर २०२४ रोजी रु.४६.९१ कोटीस मान्यता दिली आहे. भारतीय नौदलाकडून बोटीचा अधिकृतरित्या २२ फेब्रुवारी २०२४ रोजी कारवार नेवल बेस येथे बोटीचा अधिकृत ताबा घेण्यात आला. कारवार येथून विजयदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग येथे जहाज घेऊन येणे. हे जहाज १६ मार्च २०२५ रोजी यशस्वीरित्या कारवार येथून विजयदुर्ग येथील महाराष्ट्र सागरी मंडळाच्या जेट्टीवर सुरक्षितरित्या आणण्यात आले.

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या (एमएमबी) विजयदुर्ग येथील जेट्टीला विना मोबदला साधारणपणे सहा ते सात महिने सदरचे जहाज सुरक्षितरित्या ठेवण्याकरिता परवानगी देण्यात आली आहे. जहाजाची पर्यावरणीय साफसफाई करण्याकरिता नियुक्त केलेल्या संस्थेने या जहाजाची १५ एप्रिल २०२५ रोजी पूर्णपणे पर्यावरणीयदृष्ट्या साफसफाई केली आहे. आयएनएस गुलदार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्राच्या तळाशी निवती रॉक येथील येथे विराजमान करण्याकरिता माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांना १६ एप्रिल २०२५ रोजी कार्यादेश देण्यात आला असून वातावरण अनुकूल असेल त्या दिवशी प्रत्यक्षपणे ही कार्यवाही पार पाडली जाणार आहे. समुद्रात विराजमान होणाऱ्या जहाजाभोवती प्रवाळ निर्मिती होऊन त्याद्वारे स्कुबा डायव्हिंग व भविष्यात पाणबुडीद्वारे पर्यटकांना या प्रवाळ व समुद्रतळाशी विराजमान जहाजाची सफर करण्याचे नियोजित आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा