You are currently viewing पत्नीच्या दीर्घायुष्याची वटवृक्षाकडे मागणी

पत्नीच्या दीर्घायुष्याची वटवृक्षाकडे मागणी

गेल्या सोळा वर्षांपासून कुडाळात पुरुषांची वटपौर्णिमा

कुडाळ :

गेली सोळा वर्षे कुडाळ मधील पुरुष मंडळी आपल्या पत्नीसाठी वट पौर्णिमा साजरी करत आहेत. आज देखील वट पौर्णिमेचा औचित्य साधून श्री गवळदेव येथे उमेश गाळवणकर आणि मित्रमंडळींनी उत्साहात वटपौर्णिमा साजरी करत आपल्या पत्नीसाठी दीर्घायुष्याची कामना केली.

सावित्रीने यमराजाकडून आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत आणले. म्हणून दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा सण साजरा केला जातॊ. खरंतर हा महिलांचा सण. जसं वटवृक्षाला मोठं आयुष्य असतं तसंच आयुष्य आपल्या पतीला मिळावं म्हणून सुवासिनी कामना करतात. वडाची पूजा करतात. पण स्त्री आणि पुरुष हि संसार रथाची दोन चाकं आहेत. म्हणून जस एखादी स्त्री आपल्या पतीसाठी दीर्घायुष्याची कामना करते तसं मग पुरुषांनी आपल्या पत्नीसाठी का करू नये, असा विचार करून कुडाळ मध्ये बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, डॉ. संजय निगुडकर आणि मित्रमंडळी गेली १५ वर्ष आपल्या पत्नीसाठी वट पौर्णिमा व्रत साजरं करत आहेत. या व्रताचं यंदाच हे सोळावं वर्ष आहे. आज सुद्धा वट पौर्णिमेच्या निमित्ताने कुडाळ शहरातल्या श्री गवळदेव मंदिरात ही सर्व पुरुष मंडळी वडाच्या पूजेसाठी जमली होती. श्री गवळदेवाला सांगणं करून सर्वांच्या वतीने उमेश गाळवणकर यांनी वडाची यथोचित पूजा केली. त्यानंतर सर्व पुरुष मंडळींनी वडाला फेऱ्या मारत दोरा गुंडाळला.

आपली पत्नी दरवर्षी आपल्या दिर्घायूसाठी वट वृक्षाची पूजा करते. मग आपण देखील तिच्यासाठी हे व्रत का करू नये असा विचार करून गेली १६ वर्ष आम्ही सर्व पुरुष मंडळी वटपौर्णिमा साजरी करत असल्याचं प्रा. अरुण मर्गज यांनी सांगितलं. हि परंपरा बाकीच्यांनी सुद्धा सुरु करावी. आपल्या चांगल्या परंपरा जपाव्या अशी अपेक्षा प्रा. अरुण मर्गज यांनी व्यक्त केली.

महिला नेहमीच वटपौर्णिमा साजरी करतात पण कुडाळ मधले पुरुष गेली १६ वर्ष हे व्रत आपल्या पत्नीसाठी करताहेत ते तेवढंच कौतुकास्पद आणि सर्वानी आदर्श घेण्यासारखं आहे असं सौ.अमृता गाळवणकर यांनी सांगितलं.

यावेळी उमेश गाळवणकर आणि सौ.अमृता गाळवणकर यांनी एकत्र वट वृक्षाला फेऱ्या मारून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. या सोहळ्यात उमेश गाळवणकर,प्रा.अरुण मार्गज, राजू कलिंगण, प्रसाद कानडे, प्रा. परेश धावडे, सुनील गोसावी, ज्ञानेश्वर तेली, ओंकार कदम, महादेव परब, बळीराम जांभळे, अजय भाईप, सुरेश वरक सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा