सावंतवाडी : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा अवघ्या काही महिन्यात पूर्ण करून यशस्वी कामकाज केलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे सावंतवाडीचे कार्यकारी अभियंता महेंद्र केणी यांची त्यांच्याच गावी पालघर जिल्हयात कार्यकारी अभियंतापदी बदली झाली. मात्र, त्यांच्याकडे सावंतवाडी कार्यकारी अभियंतापदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
दोन वर्षांपूर्वी केणी यांची सावंतवाडी कार्यकारी अभियंतापदी नियुक्ती झाली होती. या कालावधीत बांधकाम विभागाच्या मालवण विभागाचा कार्यभार सावंतवाडी कार्यकारी अभियंता विभागाकडून कणकवली विभागाकडे सोपविला होता. याच कालावधीत राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. हा पुतळा कोसळल्यानंतर मालवणचा विभाग पुन्हा एकदा सावंतवाडी कार्यकारी अभियंता कार्यालयाकडे सोपविण्यात आला. राजकोट येथील शिवपुतळा नव्याने उभारण्यासंदर्भातील जबाबदारी कार्यकारी अभियंता केणी यांच्यावर सोपविली होती. हा पुतळा वेळेत पूर्ण करण्यात केणी यशस्वी ठरले.