*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*स्त्री : वेदनेचा दाह…*
१० वी नंतर आमच्या कापडण्याला शिक्षणाची
सोय नसल्यामुळे मी ११ वीला धुळ्याला मामांकडे राहिले. अवघे १४/१५ वय. कळत काहीच नव्हते. त्यातून आम्ही खेड्यातल्या मुली
एकदमच बावळट होतो. मामांच्या शेजारी एक
कुटुंब होते. नवरा बायको व मोठी बहिण. विधवा
होती का? मला माहित नाही. पण तिथेच रहात
होती.भावाचे दुकान होते. तो दिवसभर दुकानात.
रात्रीच घरी येत असे. आता बघा, साठ वर्षांपूर्वीची
नंणंद व भावजयी! कित्ती दरारा त्या नणंदेचा!
भावजयी कायम घरात काम काम काम नि नणंदबाई फक्त पाटीलकी करणार व घरोघर ती कशी
वाईट आहे हे चघळणार. भाऊ दुकानातून आला
की, स्वत: स्टोव्हवर गरम गरम पराठे तेलात तळून भावाच्या ताटात वाढणार.( मी पाहिले आहे.) बायको गेली
उडत. कहर म्हणजे, भावजईचे बाळंतपण झाल्यावर मला आता असे वाटते की, ती मुलगी
असावी( तेव्हा मी लहान होते, बायकांची कुचकुच फक्त ऐकलेली आठवते) म्हणून, ते
बाळ “ चिन्ह” होते असे सांगून नख लावून घरातच पुरून टाकले वाटते. तेव्हा ही मी ऐकून शहारले होते.
तर मंडळी, हे होते बायकांचे प्राक्तन. पुरूषांकडून ती नागवली गेलीच पण स्त्रीच
स्त्रीची शत्रू होती व अजूनही आहे. कालपरवा
घडलेले हुंडाबळी प्रकरण काय सांगते हो? अजून ती बाजारातच आहे व तिची विक्री आज
या नव्या जमान्यातही थांबलेली नाहीच. फक्त
तिची पीडा १८/१९ व्या शतकात वेगळी होती.
आजही फक्त पीडा बदललेली आहे एवढेच,
पीडा काही गेली नाही. अत्याचार संपले तर
नाहीतच ते वाढले आहेत.
स्त्री म्हणजे वेदनाच. अंतर्बाह्य वेदनाच. जुन्या
काळी तर ८/९ व्या वर्षीच वैधव्य येऊन आलवण
नेसून अंधारात बसायचे. घरातलेच लुटायचे पाय
मात्र फक्त तिचा घसरायचा. अत्याचार करणारा
सही सलामत असे. विधुर पुरूष १३ व्या दिवशी
बोहल्यावर चढायला मोकळा. निर्लज्ज जमात.
कारण नसतांना मारपीट घाणेरड्या शिव्या उच्चभ्रू समाजात आज ही वर्ज्य नाहीत. ही वस्तुस्थिती आहे हो. झाकली मूठ सव्वा लाखाची.
अक्कल नावाची गोष्ट फक्त पुरुषांनाच मिळाली आहे असा काही मूर्ख पुरुषांचा समज
आज ही आहे. त्यामुळे ते कायम घरात बायकोला शिव्या
घालत असतात व बाहेर बदनामी होईल म्हणून
बायका सोसत असतात. अर्थात याला जबाबदार
स्त्रियाच आहेत. दारूड्या नवऱ्याच्या कमरेत लाथ घालण्या ऐवजी त्या त्याला जेवायला घालतात. कारण तो मेला तर घरात बाहेरचे
डोमकावळे डोकावतात व तिथेही बदनामी तिचीच होते. तो नाही, ती बाहेरख्याली ठरते.
तो आणखी दुसरीकडे चरायला मोकळा.
स्त्री ला कुठल्याच प्रकारे जगू न देण्याचा यांनी
जणू विडाच उचलला आहे. स्त्री यांना कायम
फुकटची मोलकरीण व दासीच हवी आहे.
माझ्या सासरी आमच्या समोर मारवाडी व बाजूला गोसावी कुटुंब रहात होते. समोरचा तो
टिनपाट दररोज बायकोला इतका मारायचा की
आमच्या घरी ते ऐकू यायचे. माझे नुकतेच लग्न
झालेले व मी फार पुढारलेल्या पुरोगामी घरात
वाढल्यामुळे माझा तिळपापड झाला तरी सासरी
असल्यामुळे मी काही करू शकत नव्हते. नंतर
फार वर्षांनी एका लग्नात भेटल्यावर इतक्या
वर्षांनीही जाब विचारल्याशिवाय मी राहिले नाही.
फार मोठा पुरुषार्थ वाटतो का हो यांना बायकोला मारण्यात. शेजारची गोसाविण सासूबाईही मुलाला पेटवून घरोघर हिंडत असे. त्यांना मुलगा सुनेला मारतांना पाहून गुदगुल्या होत असत.बायका ढोरा सारख्या मार खात मुकाट अत्याचाराला सामोऱ्या जात व आजही
जातात. कारण माहेरी जागा नसते. एकदा लग्न
झाले, मर का रहा.. परत येऊ नको हा अलिखित
करार आहे.” दिल्या घरी तू दु:खात सुखी रहा”.
स्त्री ही कधीही पूर्ण स्वतंत्र व सुखी होणार नाही
हा तिला पुरूषप्रधान समाज रचनेचा शाप आहे.
आणि पुरूषी मानसिकता कधी ही बदलणे शक्य नाही. घरोघर झाकली मूठ सव्वा लाखाची
आहे यात जराही अतिशयोक्ती नाही. १ टक्का
सुद्धा घरे नसतील जिथे स्त्रियांचे शोषण होत नाही. समंजस नावाचा नवराच अस्तित्वात नाही
हो, कुणी मान्य करो वा न करो हेच सत्य आहे.
परिस्थिती बदलेल या आशावादावर मी नाही.
नवी पिढी तर भलतीकडेच चालली आहे. लग्न
संस्थाच मोडकळीला आली आहे. काय होणार
माहित नाही.(बघायला आम्ही नसू एवढे बरे आहे.) लहानपणापासून पहात आले आहे.आई
काकू, मावशी, मामी, आत्या ही सारी स्त्रियांची
रूपे कष्टातच पहात आले मी. या साऱ्या वेदना
बंद मुठीत व आवळलेल्या ओठात थेट सरणात
जातात व त्यांची बांधलेल्या दोरखंडासह राख
होते तीन चिमट्या नि ती नदीत वाहून जात
पृथ्वीवरचे स्त्री चे अस्तित्व संपून जाऊन ती एका
तरी नरकयातनेतून सुटते.
अहो, माहेरी बाळंतपणाला आलेल्या मुलीला दिवस भरत आल्यानंतरही शेतात काम करतांना
व शेताच्या रस्त्यावरच बाळंतपण झालेल्या स्त्रिया मला माहित आहेत. केवढे कष्ट. सासरी
जातांना आई वडिलांना साडीचोळी जड जाईल
म्हणून तिने माहेरीही राबायचे. का घडवली देवाने
स्त्री ला? असे ही मला कधी कधी वाटते. सर्व संत स्त्रियाही याला अपवाद नाहीत हो.
“जनी नामयाची दासी। झाडलोट करी।”
जाती बाहेरच्या स्त्रियांच्या हालांना तर पारावार
नव्हता. कितीही शतकांचा अभ्यास करा स्त्री
उपेक्षितच राहिली आहे.दुय्यमच राहिली अगदी
नगण्य अपवाद, वैदिक काळातही ती सुखी नव्हतीच. रामायण महाभारत तर आपल्याला
माहितच आहे, बोलण्याची गरजही नाही.
मग स्त्री वेदना नाही तर काय आहे? प्रत्येकाने
मनाशी प्रामाणिक राहून याचे उत्तर मात्र द्यायला
हवे. तिथेही आम्ही दुटप्पीच राहू याचीही मला
खात्री आहे.
बरंय् मंडळी.. धन्यवाद..
आणि हो, ही फक्त माझी मते आहेत.
प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)