सावंतवाडी रुग्णालयाच्या शवागृह व स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर…
सामाजिक बांधिलकी व रक्तदाता संघटनेच्या मागणीला यश; पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीचे आदेश…
सावंतवाडी
येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागृहाच्या दुरुस्तीसह शौचालय व स्वच्छतागृह दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यापूर्वी हे काम करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाला केले आहे. त्यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजन मध्ये रद्द करून देण्यात आला आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील शवागृह अनेक वर्षे नादुरुस्त होते. तसेच परिसरात असलेले शौचालय अस्वच्छ असते. त्यामुळे त्याचा फटका रुग्णांच्या नातेवाईकांना सहन करावा लागला होता. याबाबत आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी सामाजिक बांधिलकी आणि रक्तदाता संघटना यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्यानुसार निधी मंजूर करण्यात आला आहे.
यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील व वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी शासनाकडे तातडीची मागणी केली. मागील दीड वर्षांपूर्वी यासाठी पाठपुरावा शासन दरबारी करण्यात आला होता. मात्र तांत्रिक अडचणींमुळे ते काम रखडले होते. याबाबत युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांना रुग्णांचे होणारे हाल समजताच आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान त्यांनी ही समस्या मांडली होती. तसेच सार्वजनिक बांधकाम अभियंता महेंद्र किणी व वैभव सगरे यांची युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी व पदाधिकाऱ्यांनी भेट घेत आग्रही मागणी केली. यानंतर शासनाकडून या कामासाठी निधी मंजूर करत सार्वजनिक बांधकाम विभागाला पावसापूर्वी काम करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून दिले. त्यामुळे युवा रक्तदाता संघटना व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांचे आभार दोन्ही संघटनांकडून मानण्यात आले.