मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवात अनेकजण खोल समुद्रात मूर्ती विसर्जनासाठी जातात. यात अपघाताचा धोका असतो. शिवाय, नंतर मूर्ती पाण्यातून काढतानाही अडचणी येतात. यावर तोडगा म्हणून मुंबई महापालिकेने समुद्रातील ओहोटी रेषेजवळ मरिन नेव्हिगेशन बॉयज (दिशानिर्देशक) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कुठपर्यंत विसर्जन करावे, हे चिन्हांकित होणार आहे. परिणामी, अगदी खोल समुद्रात विसर्जन करता येणार नाही.
मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाने ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्ती आणि देवीच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी अनेकजण खोल समुद्रात जातात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. शिवाय, विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी त्या मूर्ती बाहेर काढण्यासाठीही बरीच खटपट करावी लागते. अनेक वेळा ओहोटी झाल्यावर मूर्ती चौपाट्यांवर विखुरलेल्या आढळतात, तर काही मूर्ती खोल समुद्रातच राहतात. त्यामुळे ओहोटी व भरती रेषांदरम्यान विसर्जनाचे क्षेत्र निश्चित करून त्याठिकाणी दिशानिर्देशक बसवण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरण विभागाने दिली आहे.
यामुळे एका ठराविक अंतरापर्यंतच विसर्जन करता येणार आहे. परिणामी, दुसऱ्या दिवशी समुद्रातून १०० टक्के मूर्ती सहज बाहेर काढणे शक्य होणार असल्याचे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सदर दिशानिर्देशकांवर सौर दिवेही बसवले जाणार आहेत, जेणेकरून विसर्जन करणाऱ्यांना ते स्पष्टपणे दिसतील. या कामासाठी महापालिकेने निविदाही काढली आहे. एकूण ४३ ठिकाणी ही नवी दिशादर्शक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. पर्यावरणाच्या हानीला आळा घालणे हाही यामागचा उद्देश आहे.
ही संपूर्ण यंत्रणा केंद्र शासनाच्या मान्यता असलेल्या दोन संस्थांच्या देखरेखीखाली बसवण्यात येणार आहे. मुंबईतील ओहोटी रेषा आणि भरती रेषा नेमकी कुठली, तसेच सौर दिवे असलेली दिशानिर्देशक यंत्रणा कुठपर्यंत बसवावी, हे या दोन संस्था निश्चित करणार आहेत. या कामासाठी निविदा भरण्याची अंतिम तारीख १६ जून आहे. ही यंत्रणा यंदाच्या गणेशोत्सवापूर्वीच चौपाट्यांवर कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
*प्रदूषणमुक्तीसाठी एक महत्त्वाचे पाऊल*
मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदीचे आदेश दिल्यानंतर, मुंबई महापालिकेकडून त्याची अंमलबजावणी यंदा काटेकोरपणे केली जात आहे. त्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. सौर दिव्यांसह दिशानिर्देशक बसवण्याची योजना याच उपयोजनांचा भाग आहे. त्यामुळे मूर्ती खोल समुद्रात विसर्जित करण्यावर नियंत्रण येईल. ठिकाण निश्चित केल्यानंतर, त्या ठिकाणाहून जास्तीत जास्त मूर्ती सहज बाहेर काढता येतील, आणि पर्यावरणाच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल.
सदर दिशानिर्देशक यंत्रणा गिरगाव चौपाटी, दादर शिवाजी पार्क, जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या सहा प्रमुख चौपाट्यांवर बसवण्यात येणार आहे.