You are currently viewing सिंधुकन्या प्रसन्ना परबचा राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत डंका!

सिंधुकन्या प्रसन्ना परबचा राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत डंका!

सिंधुकन्या प्रसन्ना परबचा राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत डंका!

रौप्य पदक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेत निवड.

सावंतवाडी :

रोटरी क्लब ऑफ पालघर यांच्यावतीने आयोजित केलेल्या महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप – २०२५ या राज्यस्तरीय स्पर्धेत सावंतवाडीची कन्या प्रसन्ना प्रदीप परब हिने चमकदार कामगिरी करत ज्युनियर गटात रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची कर्नाटक येथील दवणगिरी येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

रोटरी क्लब ऑफ पालघर यांनी सीनियर, सब-ज्युनियर, ज्युनियर आणि महिला व पुरुषांसाठी या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत ज्युनियर गटात ६७ किलो वजनी गटात प्रसन्ना परबने उल्लेखनीय प्रदर्शन करत रौप्य पदकाला गवसणी घातली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ज्युनियर गटात प्रतिनिधीत्व करणारी ती एकमेव खेळाडू होती. ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. आता तिची निवड कर्नाटक राज्यातील दवणगिरी येथे २२ ते २७ जून दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी झाली आहे. ज्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या या यशाबद्दल माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, मल्लसम्राट प्रतिष्ठान व ज्ञानदीप मंडळाचे अध्यक्ष जावेद शेख, सहसचिव विनायक गांवस, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांसह अनेकांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा