कणकवली बाजारपेठेत बुलेरो पिकअप टेम्पो रुतल्याने वाहतूक कोंडी
कणकवली
शहरातील बाजारपेठेमध्ये नळ योजना पाईपलाईन दुरुस्ती करताना रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यामध्ये शनिवारी सकाळी ९:३० वाजता टेम्पो रुतल्याने काही काळ बाजारपेठेत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. बाजारपेठेतील शिरसाट कापड दुकानासमोरील खड्ड्यांमध्ये अडकलेला बुलेरो पिकअप टेम्पो नागरिकांनी धक्का देऊन खड्ड्यातून बाहेर काढला.
बाजारपेठेत नगरपंचायतने नळ योजना दुरुस्तीसाठी खोदाई केलेले खड्डे मातीने बुजवल्याने अशा प्रकारचे मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. सर्वसामान्य नागरिकांनाही पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे होणाऱ्या चिखलामुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच दुकानांच्या समोर खड्डे खोदून ठेवल्याने दुकानदारांनाही या खड्ड्यांचा त्रास होत आहे. याबाबत तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी शहरवासीयांमधून व नागरिकांमधून केली जात आहे.