You are currently viewing अनोखा थाट…

अनोखा थाट…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अनोखा थाट…*

 

अल्याड डोंगर पल्याड डोंगर मध्येच झुळझुळ झरा

तुझ्या कृपेने वाहती निर्झर पावसा, करूणाकरा..

 

गडगड येतो खडखड येतो हसते पहा रे धरा

कवेत घेतो पुरता धरेला सुखावतो तू नरा

लाही लाही अंगाची ती ग्रीष्म ओततो आग

माळावरती रखरखत्या त्या पळस पांगारा फाग..

 

लालभडक त्या ज्वाला भडकती त्यात तुझी थंडाई

सेना पुरती घेऊन येतो वाजतगाजत घाई

फुले फुले ती फुलते गवत ही गाते पहा अंगाई

शालू हिरवा लेवून नटते वसु ही घाई घाई..

 

जिकडे तिकडे हिरवाईचा गंधाचा सांगावा

खेळ अनोखा समृद्धीचा पावसा तूच मांडावा…

विस्मित होते रानच सारे वेली अबोली गाती

चाफा चंपक लाल कर्दळी मोगरा ढग बाराती..

 

सळसळ सळसळ वर्षावाने सचैल सारे न्हाती

धरणीतूनती फुलून येती फुले नि गवती पाती

थेंब झेलते अधरावरती सृष्टी अधीर होऊनी

जिकडे तिकडे थेंबांची मग ओठांवरती गाणी..

 

हर्ष होऊनी धावत सुटती नद्या झरे निर्झर

झोकून देती कड्यावरूनी ते प्रपात ही सुंदर

नेत्राचे ते फिटे पारणे डोंगर पहा घनदाट

पाऊस म्हणजे वसुंधरेचा असे अनोखा थाट..

 

प्रा.सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा