कासार्डे नागसावंतवाडी या इको सेंन्सिटिव्ह झोन असलेल्या व आसपासच्या भागात अवैध सिलिका उत्खनन सुरूच
प्रशासन कारवाई करणार का? युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे तहसीलदार यांना निवेदन सादर
कणकवली
कासार्डे नागसावंतवाडी या इको सेंन्सिटिव्ह झोन असलेल्या व आसपासच्या भागात अवैध सिलिका उत्खनन अजून सुरूच असल्याबाबत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी तहसीलदार यांना निवेदन देत रात्री बेकायदेशीर उत्खनन सुरु असल्याबाबतचे पुरावे सादर केले. व यांच्यावर प्रशासन कारवाई करणार का ? असा सवाल उपस्थित केला. प्रशासनाचे अधिकारी या सिलिका माफीयांवर कारवाई करण्यास घाबरत असतील तर आम्ही तुमच्यासोबत येतो व सदर प्रकार आपल्या निदर्शनास आणून देतो असे यावेळी नाईक यांनी सांगितले. वारंवार आपणास या बेकायदेशीर वाहतुकीबाबत दि.06/02/2025 रोजी निवेदने देऊन देखील या अवैध उत्खननाला पाठीशी घातले जात आहे.
आता पाऊस गेले दोन दिवस कमी झाल्यानंतर कासार्डे नागसावंतवाडी व अन्य भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रात्रीच्या वेळी अवैध उत्खनन चालू आहे. महसूल विभागाचे काही अधिकारी व कर्मचारी यांच्या संगणमताने रात्रीच्या वेळी चालू असलेल्या उत्खलनाला कारवाई पासून वाचवले जात आहे. रात्री 8 वाजल्यापासून ते पहाटे 6 वाजेपर्यंत हे अवैध सिलीका उत्खनन सुरू असून दिवसभरात अवैध उत्खनन बंद असल्याचे भासवले जात आहे. यामध्ये कासार्डे मधील नागसावंतवाडी 3 येथील ठिकाणी, कासार्डे तांबळवाडी आवळेश्वर येथे लिज असलेल्या दोन डोंगराच्या मधील जागेत, तसेच उत्तर दक्षिण गावठाण येथे कदमवाडी व एम.एम सी माईन्स यांच्या मधील भागात देखील अनाधिकृत उत्खनन सुरू आहे.
तसेच कासार्डे येथील स्मशानभूमी जवळ लिजच्या डोंगराजवळ हे उत्खनन रात्रीच्या वेळी सुरू आहे. दिवसभर हे उत्खनन बंद ठेवून त्याचा बॅकलॉग रात्रीच्या वेळी भरून काढला जात आहे. महसूल विभागाच्या तलाठी व मंडळाधिकारी यांना ही बाब माहिती असून देखील त्यांच्याकडून याबाबत कोणतीही कायदेशीर भूमिका घेत कारवाई केली जात नाही. याउलट या प्रकाराकडे डोळेझाक करणे व रात्रीच्या वेळी मोबाईल बंद करून ठेवणे असे प्रकार आपल्या अधिकारी व कर्मचार्यांकडून सुरू आहेत. अवैध सिलिका उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल हे सिलिका व्यावसायिक बुडवत असून अवैध वाहतूक प्रकरणी सुद्धा दुर्लक्ष होत आहे. तरी या बाबत आपण एक प्रमुख पथक नेमून रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या अवैध उत्खनन तात्काळ रोखावे व त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी युवासेनेतर्फे करण्यात आली.