*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री मानसी मोहन जोशी लिखित अप्रतिम लेख*
*वारी*
पावसानं निस्ता कहर
केलायऔदा,आषाढवारीला निघायचा दिस जवळ आलाय अन ह्यो बाबा कदी न्हवं तेवढा आभाळ फाटल्यागत कोसळतोय.
वारीला औदाच्या वर्षात शेवटच जायाचं अस पारूच्या मनात होत. पंच्याहत्तर वर्षाच्या आयुष्यात कळायला लागल्या पासन तीची वारी चुकली नाही.
माय अन आप्पा बरोबर ती वारीला जायची,डोक्यावर तुळस घेऊन मैलोनमैल चालायची,पंढरीत रस्त्या रस्त्यावर रांगोळ्या घालायची,अडल्या नडल्याच्या मदतीला धावायची,सगळ्या वारीच चैतन्य असायची पार्वती.
नशिबानं धनीबी विठ्ठलभक्तच मिळाला अाणि पार्वतीच वारीच व्रत अखंड सुरू राहिल एखाद्या अग्निहोत्रा प्रमाणे.
शरिर थकल तस पार्वतीची विठ्ठलरुक्मिणीच्या भेटीची, वारीची ओढ तीव्र होत होती पण आकस्मित झालेल्या धन्याच्या मृत्यूनंतर ती एकटी पडली होती.घरुन या वयात तिनं एकटीनंच वारीला जाऊ नये म्हणून दबाव होता आणि तीचं मन कधीच पंढरीच्या वाटेवर जाऊन तिला खुणावत होत.
घरच्यांच्या विरोधाला न जुमानता पार्वतीनं वारीला जायचं प्रस्थान काढल. बांधाबांध करुन गठुड दाराशी आणुन ठेवल. भल्यापहाटे उठून परसदारी स्नानासाठी गेली आणि पाय घसरुन जोरात पडली. पायाला चार महीने प्लॅस्टर बसल पण तिचं पायाच्या दुखण्यापेक्षा विठ्ठल भेट न होण्याच दुख: तिला मोठ होत.
मुखी विठ्ठल नामाचा गजर,डोळ्यात विठ्ठल भेटीची आस,आणि मनी विठ्ठलाचा ध्यास घेऊन अशा असहाय्य अवस्थेला, नशिबाला दोष देत होती पारु.
एके दिवशी तिच्या डोक्यावरुन कुणीतरी मायेने हात फिरवतय अस पारुला वाटलं. तिन डोळे उघडून पाहिले तर तिच्या उशाशी अत्यंत तेजस्वी एक जोडप बसल होत,गळ्यात मोत्याच्या माळा,कपाळभर चंदनाचा लेप,अंगावर उपरणं आणि चेहऱ्यावर अपार माया होती त्यांच्या. तिनं क्षणात त्यांना ओळखलं. हो….तिचे मायबाप विठ्ठल रूक्मिणी तिच्या भोळ्याभक्तीसाठी युगायुगाचा विश्र्वास सार्थ करत आपल्या भक्ताच्या भेटीसाठी आले होते. आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी.
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
प्रा.मानसी जोशी.
