You are currently viewing जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आढावा बैठक संपन्न

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आढावा बैठक संपन्न

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आढावा बैठक संपन्न

आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी ‘अलर्ट मोड’वर काम करावे

-पालकमंत्री नितेश राणे

  • महावितरणांच्या कामांसाठी विशेष पॅकेज आणणार
  • खाते प्रमुखांनी कामांच्या ठिकाणी भेटी द्याव्यात
  • भूमिगत वीज वाहिन्यांचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार

सिंधुदुर्गनगरी 

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस पडत आहे. नैसर्गिक आपत्ती या अचानक येत असल्या तरी संभाव्य आपत्तींना यशस्वीपणे सामोरे जात त्यातून होणाऱ्या हानीचे प्रमाण कमी करण्यासाठी सदैव दक्ष रहावे; सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून मदतकार्य आणि माहितीचे आदानप्रदान गतीने करावे, सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून कर्तव्यभावनेने ‘अलर्ट मोड’वर काम  करावे. आपत्तीच्या प्रसंगी शासन जनतेच्या पाठीशी असल्याचे पालकमंत्री नितेश राणे  म्हणाले.

जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा व जनजीवन सुरळीत होण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक संपन्न झाली.या बैठकीला  जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, प्रभारी पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, अपर जिल्हाधिकारी स्वाती साठे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी नितीश राऊत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिश दळवी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. राणे पुढे म्हणाले, पावसामुळे वीज संबंधित अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने या विभागाने अधिक सतर्क राहावे. कर्मचाऱ्यांनी अलर्ट राहून वीज पुरवठा सुरळीत राहिल याची दक्षता घ्यावी. भविष्यात महावितरणच्या दुरूस्ती कामांसाठी विशेष पॅकेज आणणार असून या पॅकेजमधून जिल्ह्यतील वीजेचा प्रश्न कायमचा सोडविण्यात येईल. तसेच डिसेंबरअखेर भूमिगत वीज जोडणीचे काम पूर्ण करण्यात येईल.  पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे, ही कामे तात्काळ पूर्ण करावीत. संबंधित अधिकाऱ्यांनी दौरे करुन प्रत्यक्ष कामांच्या ठिकाणी नियमित भेटी देत कामांचा आढावा घ्यावा. कामाच्या दर्जेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. घाट क्षेत्रात दरडी कोसळल्यास संबंधित यंत्रणांनी तात्काळ त्याठिकाणी भेट कोसळलेली दरड बाजूला करुन घाट रस्ता सुरू करावा. संबंधित कंत्राटदारांनी त्या ठिकाणी मनुष्यबळ तैनात ठेवावे. ज्या ठिकाणी वारंवार दरडी कोसळतात अशा ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

आरोग्य यंत्रणेविषयी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, पावसाळा कालावधीत साथीच्या आजारांचे नियंत्रण करण्यासाठी नियोजन करावे, अस्वच्छतेमुळे कोणतेही आजार पसरणार नाहीत यासाठी आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहावे, तसेच कोविडच्या अनुषंगाने देखील नागरिकांनी काय काय खबरदारी घ्यावी याविषयी जन जागृती करावी. वन विभागाने यापुढे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कामे संपवावीत. रस्त्यांवर झाड पडल्यास ते झाड त्वरित बाजूला करण्याबाबत योग्य ते नियोजन करावे. तेसच अशा रस्त्यांवरची धोकादायक झाडे/ फांद्या बाजूला करण्यात याव्यात. संबंधित कर्मचाऱ्यांनी पावसाळ्यात जिल्हाभरात फिरून परिस्थितीचा आढावा घेऊन उपाय योजना कराव्यात. एसटी विभागाने देखील पावसामुळे प्रवाशांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. नगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे तात्काळ हाती घ्यावीत, जेणेकरुन स्वच्छता राहिल. नगरपालिका अखत्यारीतील रस्त्यांची कामे पूर्ण करावीत. मान्सून कालावधीत नगरपालिका क्षेत्र स्वच्छ राहिल याची दक्षता घ्यावी. नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा करावा. जिल्ह्यातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी बैठक घेवून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास करावयाच्या नियोजनाबाबत विचार विनिमय करावा असेही निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा