You are currently viewing जोगींना सगळ्याच गोष्टीत राजकारण, अर्थकारण दिसते – विजय केनवडेकर

जोगींना सगळ्याच गोष्टीत राजकारण, अर्थकारण दिसते – विजय केनवडेकर

मालवण

शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांना सगळ्याच गोष्टीत राजकारण आणि अर्थकारण दिसत आहे तसे आमचे नाही. तोक्ते वादळात नुकसान भरपाई ही नुकसान झालेल्या जनतेला सरकारने देणे क्रमप्राप्त होते. त्यामध्ये राजकारण करणे हे बरोबर नव्हते. संबंधित नुकसान भरपाई मिळालेल्यांची यादी पाहता कुणाला किती पैसे मिळाले याची सरकारी यादी आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना झालेल्या नुकसानी पैकी सरकारने किती पैसे दिले याचीही यादी आमच्याकडे आहे. त्यामुळे बाबी जोगी यांनी भाजपच्याच कार्यकर्त्यांनी लाभ घेतला हे म्हणणे चुकीचे असून हा लाभ ज्याचे नुकसान झाले त्याला देणे क्रमप्राप्त होते असे भाजपचे शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी पत्रकात म्हटले आहे.

आम्ही कुठलेही आंदोलन करत असताना अर्थकारण बघून राजकारण केले नाही. मी तालुकाध्यक्ष असताना नदी किनारपट्टीतील नागरिकांनी वाळू प्रश्नाबाबत माझ्याकडे तक्रारी घेऊन आल्यानंतरच मी वाळू प्रश्नाला हात घातला होता. त्यावेळी या वाळू व्यावसायिकांकडून किंवा आंदोलनकर्त्यांकडून कधी अर्थकारणाची अपेक्षा ठेवली नाही. असले अर्थकारण कधी आम्ही केले नाही. ज्यावेळी मी वाळू प्रश्न हातात घेतला त्यावेळी आमदारही वाळू प्रश्नाला हात घालण्यास धजावत नव्हते. त्यावेळी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे प्रामाणिक काम मी करत आहे करत राहीन. आता परिस्थिती वेगळी आहे अनधिकृत वाळू व्यावसायिकांना आमदारांचेच आशिर्वाद आहेत हे सर्व जनता जाणून आहे. या अनधिकृत वाळू संदर्भात का कारवाई होत नाही हे पण आपण जाहीर करावे. सरकार मध्ये असताना एक भूमिका आणि विरोधात असताना एक भूमिका हे आमचे धोरण नाही. त्यामुळे राजकारण हे माझे उपजीविकेचे साधन नाही. ज्यावेळी बाबी जोगी सत्तेमध्ये होते. त्यावेळी पर्ससीनधारक मच्छीमारांच्या विरोधात ठामपणे उभे राहून विरोध का केला नाही? त्यावेळी पर्ससीन मच्छिमारी बंद होती का? ज्यावेळी सत्तेत नसतात त्याचवेळी मच्छीमारांच्या विरोधातले आंदोलन त्यांना आठवते असे आमचे नाही. असा टोला त्यांनी जोगी यांना लगावला.

जनतेला माहित आहे मालवणात गॉगल गॅंग काय करत होती. याचे लोकांनी अनुभव घेतले आहेत. ज्यावेळी काळसा बागवाडी येथे पूर आला होता. त्यावेळी पूरग्रस्तांना कोणीही मदत करण्यास तयार नव्हते. त्यावेळी हे सर्व नागरिक ब्ल्यू झोन मध्ये असल्यामुळे त्यांना कुठलीही मदत मिळू शकत नाही हे प्रशासनाचे व आमदारांचे ठाम म्हणणे होते. त्यावेळी रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने बागवाडीतील सरकारी पंचनामे करून घेऊन ३६ जणांना प्रत्येकी दहा हजार रुपये मदत तेराव्या दिवशी मिळवून दिली होती. त्यामुळे मदत कशी मिळवून द्यावी हे बाबी जोगी यांनी मला सांगू नये. तसेच कोविड काळामध्ये दशावतारी मंडळांना एक लाख रुपयाची मदत जाहीर केली होती. त्यात पण पक्षपाती करण्यात आला होता. पण शिदे भाजपा युती सरकार आल्याबरोबर निलेश राणे यांच्या सहकार्यातून सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून १२ दशावतारी मंडळांना एक लाख रुपये प्रत्येकी मिळवून दिले. यात आम्ही अर्थकारण केले नाही हे जोगी यांनी मंडळाला प्रत्यक्ष भेटून चौकशी करून घ्यावी. आम्ही जनतेचे सेवक म्हणूनच या आधी काम करत होतो आणि शेवटपर्यंत जनतेचे सेवक म्हणूनच काम करणार आहोत.

तालुकाध्यक्ष असताना बऱ्याच विकास कामात अर्थकारण मला करता आले असते. मला तशा ऑफर पण होत्या तसे अर्थकारण न करता जनतेच्या सर्वसामान्य प्रश्नाबरोबर राहून ते सोडवण्याचे काम मी प्रामाणिकपणे करत आहे. असे प्रामाणिक काम तुम्ही केले आहात का? याचा जरा लेखाजोगा करून घ्यावा असा टोलाही केनवडेकर यांनी जोगी यांना लगावला आहे.

जे बाबी जोगी आमदारांची तळी उचलत आहेत. ज्यावेळी वैभव नाईक आमदारकीसाठी मालवण कुडाळ मतदारसंघातून लढा देत होते. त्यावेळी तन, मन, धनाने आम्ही युतीचा धर्म पाळून नाईक यांना विजयी करण्यासाठी काम करत होतो. कोणत्याही प्रलोभनांना आम्ही बळी पडलो नाही. त्यावेळी जोगी आमदारांच्या विरोधात काम करत होते हे पण जोगी यांनी लक्षात घ्यावे. नऊ वर्षाच्या कालखंडामध्ये माझे वैयक्तिक एकही काम आमदारांकडे मी घेऊन गेलो नाही. कोणत्याही प्रकारची युतीच्या काळामध्ये आमच्यावर विकास कामाचा झालेल्या अन्याय सहन करून आम्ही कधी वरिष्ठांकडे आमदारांची तक्रार पण केली नव्हती. त्यामुळे आत्ता जे आमदारांचे गोडवे गातात ते गोडवे गाण्यासाठी आमदार होण्यासाठी नाईक यांना मदत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही प्रामाणिकपणे केली होती याची माहिती जोगी यांनी करून घ्यावी असेही श्री. केनवडेकर यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − nine =