‘बायना का आयना’ नाटक २४ मे रोजी सावंतवाडीत
२५ मे रोजी कुडाळमध्ये रंगणार
सावंतवाडी:
वेश्याव्यवसायाच्या वास्तवावर प्रकाश टाकणारे आणि प्रेक्षकांना अंतर्मुख करणारे ‘बायना का आयना’ हे दोन अंकी मराठी नाटक येत्या २४ मे रोजी सावंतवाडीत तर २५ मे रोजी कुडाळ येथे सादर होणार आहे. सिमेन्स सांस्कृतिक संस्थेने या नाटकाची निर्मिती केली असून, या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन महेश सावंत पटेल यांनी केले आहे. त्यांच्या या संहितेला राज्यस्तरीय अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकावर आधारित
सिंधुदुर्गातील ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांच्या ‘अर्ज मधील दिवस’ या पुस्तकावर हे नाटक आधारित आहे. डॉ. पाटकर यांनी गोव्यातील बायना या एकेकाळच्या रेडलाइट वस्तीत मनोविकारतज्ज्ञ म्हणून काम करताना आलेले अनुभव या पुस्तकात मांडले आहेत. हेच अनुभव ‘बायना का आयना’ नाटकातून प्रेक्षकांसमोर आणले जात आहेत.
गैरसमज दूर करणारे नाटक
वेश्याव्यवसायाबाबत समाजात असलेले अनेक गैरसमज दूर करण्याचे काम हे नाटक करते. तसेच, प्रेक्षकांना या विषयावर सखोल विचार करण्यास आणि अंतर्मुख होण्यास प्रवृत्त करते. सामाजिक जाणीव निर्माण करणारे हे नाटक रसिकांनी आवर्जून पहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

