टोपीवाला हायस्कुलची आर्या राणे व श्रेयस बर्वे १०० टक्के गुणांसह प्रथम
मालवण तालुक्याचा निकाल ९९. ३९ टक्के | ३० शाळांचा निकाल १०० टक्के
मालवण
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावी परीक्षेत मालवण तालुक्याचा निकाला टक्के ९९.३९ लागला. तालुक्यातून ९८७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले त्यापैकी ९८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ४६४ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी तर ३६१ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. १४० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि १६ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. मालवण तालुक्यातील ३४ शाळांपैकी ३० शाळांचा निकाल १०० टक्के लागला. अ. शि. दे. टोपीवाला हायस्कुलच्या आर्या अजित राणे व श्रेयस चंद्रशेखर बर्वे यां दोन विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवीत प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला. तर कट्टा वराडकर हायस्कुलची विद्यार्थिनी हर्षदा किसन हडलगेकर हिने ९९. ४४ टक्के गुण मिळवीत द्वितीय क्रमांक तसेच वराडकर हायस्कुल कट्टा येथील श्रेया समीर चांदरकर हिने 98.40 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकवाला.
मालवण तालुक्यातील शाळांचा निकाल खालील प्रमाणे
टोपीवाला हायस्कुलचा निकाल १०० टक्के | आर्या राणे व श्रेयस बर्वे १०० टक्के गुण
मालवण येथील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कुलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. या शाळेमधून परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व १२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेतील आर्या अजित राणे व श्रेयस चंद्रशेखर बर्वे या दोन्ही विद्यार्थ्यांनी प्रत्येकी १०० टक्के गुण मिळवून प्रशालेसह मालवण तालुका व सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावीत नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. शाळेतून निशांत शरद धुरी याने ४८९ गुण मिळवीत द्वितीय क्रमांक मिळविला. तर अमूल्या हेमंत साटम हिने ४८८ गुण मिळवीत तृतीय क्रमांक मिळविला. आर्या समीर लवू (४८४) हिने चतुर्थ क्रमांक तसेच सायली विनायक भिलवडकर (४८१) व जिज्ञासा शिवराम सावंत (४८१) यांनी पाचवा क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुदेश मयेकर, सचिव विजय कामत, मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
चौके हायस्कुल १०० टक्के
चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित भ. ता चव्हाण म.मा. विद्यालय चौके या प्रशालेचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेले सर्व ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या प्रशालेतून निहारिका महेश सावंत हिने ८९. ८०टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. तर समीक्षा धोंडी सडवेलकर (८७. ६०टक्के ) हिने द्वितीय क्रमांक व श्रीयन सतेज चव्हाण हिने तृतीय क्रमांक मिळविला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रसिका गोसावी यांच्यासह शिक्षक वृंद, मुंबई संस्था पदाधिकारी, स्थानिक संस्था अध्यक्ष बिजेन्द्र गावडे यांनी अभिनंदन केले.
कन्याशाळा १०० टक्के निकाल
मालवण येथील ल. टो. कन्याशाळेचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये प्रथम- तरन्नुम अबुबकर बांगी (७८.८० टक्के), द्वितीय – हर्षिता रवि गावकर (७८ टक्के), तृतीय- कृष्णा संजय अमरे (७३.६० टक्के) यांनी यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे कृ. सि. देसाई शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
रोझरी इंग्लिश मीडियम स्कूल १०० टक्के
मालवण येथील रोझरी इंग्लिश मीडियम स्कूल दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये प्रथम चैत्राली मेस्त्री (९५.०८ टक्के), द्वितीय वेदांती फोंडेकर (९३.०८ टक्के) तृतीय एरीक मेंडीस व तृष्टी केळुसकर (९२.०८ टक्के) यांनी यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था चालक, प्रिन्सिपल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
देवबाग हायस्कुलचा निकाल १०० टक्के
देवबाग येथील डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कुलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. यामध्ये कुमार दत्तप्रसाद तेंडोलकर याने ९१. ६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. तर वेदिका महेंद्र शेलटकर (८६. ८० टक्के) हिने द्वितीय क्रमांक तर पवित्रा शंकर कुमठेकर (८४. २० टक्के) हिने तृतीय क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे अखिल देवबाग विकास मंडळ मुंबईचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका सौ. रचना रुपेश खोबरेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमध्ये आर्यन गोलतकर प्रथम
मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुल मालवणचा निकाल ९७. २२ टक्के लागला. या परीक्षेस ७२ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील ७० उत्तीर्ण झाले. आर्यन आनंद गोलतकर ९५. ६० टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम आला. विशेष प्रविण्य श्रेणीत २५, प्रथम श्रेणीत २९, द्वितीय श्रेणीत १५ तर उत्तीर्ण श्रेणीत १ विद्यार्थी उत्तीर्ण झाला. प्रशालेतून जान्हवी प्रमोद चव्हाण ही ९४ टक्के गुण मिळवून द्वितीय तर भूमिका प्रसाद केळूसकर ९२ टक्के गुण मिळवून तृतीय आली. प्रणव मिलिंद डिचवलकर याने ९१. २० टक्के गुण मिळवून चतुर्थ आणि भावेश ललितकुमार वराडकर हा विद्यार्थी ९१ टक्के गुण मिळवून पाचवा आला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण मुंबई चे अध्यक्ष विजय पाटकर, चेअरमन सुधीर हेरेकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर, खजिनदार जॉन नरोना, मुख्याध्यापक हणमंत तिवले यांच्यासह संस्था पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
ओझर विद्यामंदिरचा निकाल १०० टक्के
कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर या शाळेचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले सर्व १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा यावर्षीही शंभर टक्के निकाल लागला आहे. भूमिका सदानंद कोचरेकर हिने ९१ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. तर संचिता संदेश परब (८९. ८० टक्के) द्वितीय क्रमांक आणि कुमार राज केशर जुवाटकर (८६ टक्के) तृतीय क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समितीचे अध्यक्ष शेखर राणे, सचिव जी. एस. परब, खजिनदार शरद परब, सर्व संचालक, शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे, सर्व सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, पालक शिक्षक संघ यांनी अभिनंदन केले.