You are currently viewing ११ ते १४ मे रोजी गिर्ये येथे बुद्ध विहार सुवर्ण महोत्सवानिमित्त भव्य कार्यक्रम

११ ते १४ मे रोजी गिर्ये येथे बुद्ध विहार सुवर्ण महोत्सवानिमित्त भव्य कार्यक्रम

देवगड :

देवगड तालुक्यातील गिर्ये येथे बुद्ध विहाराच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मौजे गिर्ये बौद्धजन विकास मंडळ मुंबई/ग्रामीण आणि पंचशील महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ११ ते १४ मे २०२५ दरम्यान हा महोत्सव पार पडणार असून, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल या काळात अनुभवायला मिळणार आहे.

११ मे रोजी संध्याकाळी चार वाजता आकर्षक बुद्धिस्ट प्रदर्शनीचे उद्घाटन पद्मश्री दादा इदाते यांच्या हस्ते होणार असून, त्यानंतर संध्याकाळी बुद्धमूर्तींची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. १२ मे रोजी सकाळी दहा वाजता बुद्ध विहाराचे उद्घाटन,बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना आणि बुद्ध पूजाविधी आयोजित करण्यात आले आहेत. या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री ना. आशीष शेलार यांची उपस्थिती लाभणार असून, अध्यक्षस्थानी माजी मंत्री मा. विजय (भाई) विठ्ठल गिरकर राहणार आहेत.

१२ मेच्या रात्री साडेआठ वाजता महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ‘जागर संविधानाचा, सांस्कृतिक मानवंदना’ हा विशेष कार्यक्रम सादर केला जाणार आहे. १३ मेच्या रात्री आठ वाजता गिर्ये विजयदुर्गमधील कलावंतांचा नृत्याविष्कार होणार असून,१४ मे रोजी रात्री आठ वाजता गिर्ये बौद्धजन विकास मंडळातर्फे महाअर्थवाचन व भिक्खू संघांच्या भव्य मेळाव्याने या महोत्सवाचा समारोप होणार आहे.हा संपूर्ण कार्यक्रम गिर्ये ग्रामपंचायतच्या सभागृहाजवळील परिसरात होणार आहे, संयोजनाची जबाबदारी मुंबई अध्यक्ष भारत विठ्ठल गिरकर, कार्याध्यक्ष योगेश विजय गिरकर, संजय शंकर गिरकर(सरचिटणीस मुंबई) ग्रामीण अध्यक्ष संतोष विठ्ठल गिरकर, सरपंच सौ. लता दिलीप गिरकर सांभाळणार आहेत.या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा