*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तुम्हां साठी राया*
साज शृंगार केला
कळी गालावर खुलते
तुम्हासाठी बाजीराव
आज नटते, मुरडते
लागे हळदीचा रंग
चढे सौंदर्याची लाली
आला नवरदेव दारी
तिची काया थरथरली
गजरा मोगऱ्याचा आणा
तुम्ही केसावरी माळा
काळ्या ठिपक्यांची राया
साडी आणा चंद्रकळा
रुणुझुणु पैंजणाची
किणकिण बांगड्यांची
चंद्रकोर खुलविते
बिंदी माझीया भाळीची
कमरपट्टा मोतियाचा
जरतारी चांद्रमाळ
तुम्ही माझ्या हृदयात
रहा सदा सर्वकाळ
लावण्यात आज न्हाले
घडी मिलनाची आली
दुनियेची ऐशी तैशी
बाहुपाशी विसावली
*शीला पाटील चांदवड*