भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा दीक्षांत समारंभ उत्साहात…
सावंतवाडी
यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा दीक्षांत समारंभ आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समारंभात १०० हून अधिक भावी फार्मासिस्टना पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडीतील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. मिलिंद खानोलकर आणि प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. राजेश नवांगुळ यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले.
यावेळी संस्थेचे सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. रमण बाणे आणि यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. विजय जगताप व्यासपीठावर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. जगताप यांनी आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला आणि विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा उल्लेख केला.
डॉ. राजेश नवांगुळ यांनी विद्यार्थ्यांना भावी व्यावसायिक जीवनासाठी शुभेच्छा देताना समर्पण, कठोर परिश्रम आणि सतत ज्ञानार्जन करण्याची आवश्यकता विशद केली. डॉ. मिलिंद खानोलकर यांनी विद्यार्थ्यांना यशासाठी कोणताही शॉर्टकट न वापरण्याचा सल्ला दिला. प्रामाणिक प्रयत्न हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे, असा महत्त्वपूर्ण संदेश त्यांनी दिला. अध्यक्षीय भाषणात अच्युत सावंतभोसले यांनी संस्थेच्या ध्येयधोरणांविषयी माहिती दिली आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राच्या विकासासाठी संस्था नेहमीच कटिबद्ध राहील, असे आश्वासन त्यांनी दिले. मान्यवरांच्या हस्ते सर्व पदवीधारकांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. या वेळी नवोदित फार्मासिस्टांनी आपल्या पदाच्या कर्तव्याची शपथ घेतली. कार्यक्रमाचे निवेदन नमिता भोसले यांनी केले तर प्रणाली जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.