बारावीचा निकाल उद्या ५ मे ला होणार जाहीर…
पुणे
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (MSBSHSE) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कारण बारावीचा निकाल उद्या म्हणजे ५ मे ला जाहीर होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने नुकताच ही घोषणा केली. उद्या दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहयला मिळेल. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली.
माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांत परीक्षेचा बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. ५ मे ला दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर होईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना निकालाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. बारावीची परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती.
बारावीच्या परीक्षांच्या निकालाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर निकालाची तारीख कधीही जाहीर केली जाऊ शकते असे देखील सांगितले जात होते. त्यानुसार आज बारावीच्या निकालाची तारीख राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी जाहीर केली.