सावंतवाडी :
मुंबई गोवा महामार्ग शहराच्या बाहेरून जाताना गप्प बसलेले सरकार आता शक्तीपीठ महामार्गासाठी एवढे आग्रही का ? त्यामागे त्यांच्यात तुमचा कोणता स्वार्थ आहे ? असा सवय ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मायकल डिसोजा यांनी पत्रकार परिषदेत केला.
श्री डिसोजा सावंतवाडी येथील शिवसेना शाखेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, विनोद ठाकूर, बाळू माळकर, बंड्या घोगळे आबा केरकर आदी उपस्थित होते.
दरम्यान सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर मिळावेत अशी मागणी असताना ती सोडून त्या ठिकाणी १३ अँब्युलन्स केसरकरांनी वाटल्या. त्या बांबूळी मध्ये जाण्यासाठी अशी खिल्ली डिसोजा यांनी उडवली. श्री डिसोजा म्हणाले शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून सह्याद्रीचा कणा पोखरण्याचे काम सत्ताधारी पक्ष करत आहेत. त्या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग जाणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होणार आहे. जैवविविधता नष्ट होणार आहे. अशा परिस्थितीत त्या ठिकाणी महामार्ग होण्यासाठी माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर खूप आग्रही आहेत. त्या मुद्द्यावरून नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत ते रेटून बोलताना दिसले. विशेष म्हणजे सावंतवाडी शहर सद्यस्थितीत दुर्लक्षित झाले आहे.
मुंबई गोवा महामार्ग, बांदा- संकेश्वर हा मार्ग बाहेरून गेल्यामुळे आता शहरात कोणी पर्यटक येत नाहीत. त्यामुळे भर दुपारी बाजारात कोणीच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराला दीपक केसरकर यांचा हेकेखोरपणा जबाबदार आहे. त्यामुळे आम्ही आता शिवसेना म्हणून गप्प बसणार नाही तर केसरकर यांच्या मागणीला आम्ही ठामपणे विरोध दर्शवणार आहे. या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग झाल्यास त्याचा मोठा फटका पर्यावरणाला, शेतकऱ्यांना बसणार आहे. मात्र कवडी मोलाने घेतलेल्या जमिनी संबंधितांना मोठ्या भावाने विकल्या जाणार आहेत. या सर्वांमध्ये अनेक धनदांडग्या लोकांचे हात आहेत. त्यामुळे हा प्रकार उधळून लावण्यासाठी आता शिवसेना पुढे येणार आहे.