You are currently viewing कणकवली पं. स ने सुरू केलेल्या गावठी आठवडा बाजाराचे महाराष्ट्राने अनुकरण करावे

कणकवली पं. स ने सुरू केलेल्या गावठी आठवडा बाजाराचे महाराष्ट्राने अनुकरण करावे

आमदार नितेश राणे यांनी व्यक्त ​केली होती इच्छा ​

पंचायत समिती, स्नेह सिंधू कृषी पदवीधर संघामार्फत गावठी वस्तूंच्या आठवडा बाजाराचा शुभारंभ

कणकवली

गावठी वस्तूंचा आठवडा बाजार मुंबईत सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल व गावठी उत्पादनांना थेट मुंबई ठाणे येथे बाजारपेठ उपलब्ध झाली तर यातून शेतकऱ्याला याचा चांगला फायदा होईल. या दृष्टीने मी व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई हेदेखील प्रयत्नशील आहेत. गावठी वस्तूंच्या आठवडा बाजाराची संकल्पना येत्या काळात तुम्हाला महाराष्ट्रभरात राबवलेली दिसेल अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. कणकवली येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाच्या कार्यालयाच्या आवारात पुन्हा एकदा गावठी वस्तुंच्या आठवडा बाजाराचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या उद्घाटन प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, कणकवली सभापती मनोज रावराणे, उपसभापती दिव्या पेडणेकर, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, पंचायत समिती सदस्य भाग्यलक्ष्मी साटम, हर्षदा वाळके, मिलिंद मेस्त्री, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, स्नेह सिंधू कृषी पदवीधर संघाचे हेमंत सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दर शुक्रवारी हा गावठी वस्तूंचा आठवडा बाजार भरणार असून, या आठवडा बाजारात अस्सल गावठी उत्पादने ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. यापूर्वी तत्कालीन सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांच्या कारकिर्दीत या गावठी वस्तूंच्या आठवडा बाजाराचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत सुरू असलेले काम व त्यापाठोपाठ कोरोनामुळे झालेले लॉक डाऊन यामुळे गेले दहा महिने गावठी आठवडा बाजार बंद ठेवण्यात आला होता. मंगळवारी पुन्हा एकदा या आठवडा बाजाराचे उद्घाटन राणे यांच्या हस्ते करत सर्वसामान्य शेतकरी ते थेट ग्राहक अशी उत्पादनाची विक्री व्यवस्था सुरू करण्यात आली. अनेक शेतकऱ्यांनी व गावठी वस्तूच्या विक्रेत्यांनी या उपक्रमाबद्दल कणकवली पंचायत समिती व आमदार नितेश राणे यांचे आभार मानत लॉकडाउन काळात आम्हाला ज्या अडचणी आल्या त्यातून सावरण्यासाठी आम्हाला हा चांगला पर्याय असल्याची भावना व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेले कृषी कायदे यांना खऱ्या अर्थाने या गावठी आठवडा बाजार यांच्या माध्यमातून पाठिंबा मिळत आहे. बाजार समित्या अस्तित्वात राहिल्या तरी शेतकऱ्यांना थेट पर्यायी या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्राने याचं अनुकरण करावे अशी माझी आग्रही मागणी असणार असल्याचेही नितेश राणे यावेळी म्हणाले. या गावठी आठवडा बाजारात गावठी तांदूळ, गावठी पीठ, गावात घरगुती पद्धतीने बनवलेले लाडू, चकली, पुरणपोळी, पालेभाजी, गावठी कोंबडी, व जंगलात सापडणारे पाळलेले ल्हावे अशा अनेक गावठी वस्तू या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत्या. प्रत्येक स्टॉल विक्रेत्याची भेट घेत नितेश राणे यांनी त्यांच्याशी संवाद साधला व गावठी उत्पादनांची माहिती घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + one =