प्राधिकरण, निगडी-
पिंपरी चिंचवड साहित्य मंच चे निमंत्रित कवींचे शब्संदवैभव “काव्य संमेलन भक्ती शक्ती जवळील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महात्मा बसवेश्वर उद्यान येथे प्रा. तुकाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. विविध रंगाच्या, ढंगाच्या कवितांनी संमेलनास रंगत आणली.
वीरशैव लिंगायत समाज, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, बसवेश्वर पुतळा समिती, मल्लिकार्जुन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हे दिमाखदार कविसंमेलन झाले.
वेगवेगळ्या विषयांवर कविंनी कविता सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली.
“माहेरचा सूर्य लाडिक वागतो
कोवळ्या किरणांनी हलकेच जागवतो
सासरच्या सूर्य भल्या पहाटे येई
दिस उगवायच्या आधी होते कामाची घाई”
असे सविता इंगळे यांनी महिला वर्गाला सुखावले.
“आला आखाजीचा सण झोका झाडाले बांधू
पाय भूईवर ठेवून झेप आकाशात घेऊ”
म्हणत मा.पीतांबर लोहार यांनी अक्षय तृतीया अर्थात आखाजी सणाची खानदेशी अहिराणी बोलीभाषा ढंगातील गेय सादर करून मंत्रमुग्ध केले.
“अंगणात भुंगा करतोया दंगा
गुण गुण गातो गाणी
गुण गुण गातो गाणी””शोभा जोशी यांनी काव्यात अंगण चित्ररूपाने उभे केले. तर,
“प्रत्येक थेंब पाण्याचा जपायलाच हवा
उद्यासाठी जमिनीमध्ये साठवायला हवा ” कैलास भैरट
यांनी पाण्याचे महत्त्व आपल्या कवितेतून सांगितले.
“दाट भरावं आभाळ कोसळांव धरेवर
धारा झिम्माड, झिम्माड माझीच आस खरोखर ” यातून
वंदना इन्नाणी यांनी पावसाची ओढ दाखविली.
कविता महाराष्ट्र गर्जना
“लावूनी बाजी प्राणांची वीरगती ज्यांनी पत्करली
होते दिलदार सरदार ते निष्ठावान राजांना”असे ज्येष्ठ कवी बाबू फिलीप डिसोजा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची ओळख महाराष्ट्र राज्य दिनानिमित्त जागविली.
मंचावरील निमंत्रित कवींनी आपल्या कवितेतून दाद मिळविली.
“फेकून द्या रे भेद गड्यांनो देश भारत समर्थ रहावा
विचार पेरूनी बंधुत्वाचा माझा भारत एक व्हावा ”
संयोजक कवी मा.राजेंद्र घावटे यांनी भेद भाव नको असे आवाहन केले.
मराठी स्वरचित दोहे संस्थेचे अध्यक्ष मा.राज अहेरराव यांनी सादर केले “साधू साधा शोध तू, नको टिळ्याची आस पोपटपंची न कामी, व्यर्थ होई प्रवास” या दोह्याने अंतर्मुख केले.
सुत्रषंचालिका सीमा शिरीष गांधी यांनी अक्षर महत्त्व सांगितले. आपल्या कवितेतून त्या म्हणाल्या
“अक्षरनगरीच्या सफरीत घडावे सारे मंगलमय,
न उरावी असूया, न उरावे भय
मौनातल्या शब्दांचा ईश्वरास अर्थ कळावा…
पुढला जन्म मात्र अक्षरांचाच मिळावा”
प्रथितयश हास्य कवी मा. अनिल दीक्षित यांनी पत्रात काय ते लिवा म्हणत राजकारण्यांना बोचकारे काढले.
चंद्रकांत धस, मीना शिंदे, अरूण कांबळे, हेमंत जोशी, दत्तू ठोकळे, ज्योती देशमुख, आदिंनी आपल्या रचना सादर केल्या.
लावणी, पोवाडा प्रकार देखील कविंनी सादर केला.
सर्व कविंचा यथोचित सन्मान पुतळा समितीचे अध्यक्ष मा.नारायण बहिरावडे आणि आयोजकांनी केला.