कुडाळ
जांभवडे येथील प्रा.अनिल काटकर या शिक्षकाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सदर आरोपीला त्वरीत अटक करावी या मागणीसाठी आज प्रजासत्ताक दिनी दुपारी 12 ते 3 या वेळेत शिक्षक भारती सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने कुडाळ पोलीस स्टेशनच्या समोर जोरदार घोषणा देत धरणे आंदोलने छेडण्यात आले असून या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून माध्यमिक शिक्षक-शिक्षिका धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.सदर आरोपी हा पोलीसांना गुंगारा देत फरार झाला असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल व त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन कुडाळ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिल्याने सलग तीन तास सुरु असलेले धरणे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे.
या आंदोलनस्थळी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन सदर आरोपीला अटक करुन कडक कारवाई करण्यासंदर्भात पोलिस अधीक्षकांना फोनवर सूचना दिल्या व आंदोलन कर्त्याना त्यांनी मार्गदर्शन केले.
शिक्षक भारतीचे राज्य प्रमुख कार्यवाह तथा जिल्हा अध्यक्ष संजय वेतूरेकर यांच्या नेतृत्वाखाली आज झालेल्या धरणे आंदोलनात शेकडो शिक्षक सहभागी झाले होते यामध्ये जांभवडे हायस्कूल चे संस्थाध्यक्ष सुभाष मडव, जांभवडे मुख्याध्यापक शंकर सावंत, व सर्व स्टाफ मारहाण झालेले प्रा.अनिल काटकर,तसेच शिक्षक भारतीचे शेकडो शिलेदार सहभागी झाले होते.
शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर याप्रसंगी म्हणाले की जोपर्यंत सदर आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत शिक्षक भारती कदापि गप्प बसणार नसून कायदा हातात घेणाऱ्यांना या दशहत माजविणा-या आरोपीला अटक झालीच पाहिजे अशी जोरदार मागणी त्यांनी यावेळी करीत लवकर अटक नाही झाली तर पुढच्या आंदोलनाचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
दरम्यान शिक्षक भारतीच्या या धरणे आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे प्रसाद पडते,उच्च माध्यमिक शिक्षक संघटना पदाधिकारी तसेच माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण पावसकर व इतर पदाधिकाऱ्यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन,या धरणे आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला.
या आंदोलनात शिक्षक भारतीचे राज्य प्रतिनिधी सी.डी चव्हाण, कार्याध्यक्ष प्रशांत आडेकर, सचिव सुरेश चौकेकर,संघटक समीर परब, महिला आघाडी प्रमुख सुष्मिता चव्हाण व सर्व जिल्हा पदाधिकारी,सर्व तालुका अध्यक्ष ,सचिव तसेच मोठ्या संख्येने शिक्षक बंधू भगिनींनी सक्रीय सहभाग दाखवत शिक्षकाला मारहाण करणाऱ्या या आरोपीला त्वरीत अटक करण्याची जोरदार मागणी केली.दरम्यान आम.कपील पाटील,शिक्षक भारती राज्य अध्यक्ष अशोक बेलसरे यांनी अन्यायग्रस्त प्रा. काटकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधून न्याय मिळवून देण्याचे अभिवचन देत धीर दिला.
याप्रसंगी शिक्षक भारती संघटना मला न्याय मिळवून देण्यासाठी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे खुप धीर आला…. माझ्यावर आलेल्या प्रसंगाला संघटनेमुळे तोंड देण्याची ताकद मिळाली याबद्दल प्रा.अनिल काटकर यांनी संघटनेला धन्यवाद दीले.याप्रसंगी
आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणा देऊन कुडाळ पोलिस स्टेशन परिसर दणाणून सोडला.