*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम लेख*
*तुझे असणे*
पहाटेची मंगलमय वेळा.. चराचरात प्रसन्नता …निरव शांतता.. गारवा भरून उरलेला… लाल केशरी रंगांच्या विविध छटांची आकाशात उधळण.. सुंदर शांत प्रसन्न बालरवीचे सुवर्ण रथावर स्वार होत ..आगमन… थंडगार वा-याच्या झुळकीने लता वेलींवर झुलणारी हिरवी पोपटी पाने.. डोळे किलकिले करीत साखरझोपेतून जाग्या होणा-या कळ्या.. त्यांच्या मंद सुगंधाच्या दरवळाने भारलेले वातावरण.. निसर्गात अशी प्रसन्नता.ताजेपणा..कोमलता.. नि माझ्या मनांत अचानकच एक सुखद.. सुगंधी.. अनूभूतीची जाणीव उमलली.
नुकतीच मी गुरूंची मानसपूजा पूर्ण केली होती. नी एक हलकीशी सुखद अनूभूतीची झुळुक माझ्या मनाला स्पर्शून गेली. नि” तुझे असणे.” माझ्या.गुरूचे माझ्या आसपास वावरणे … गुरूचे अस्तित्व मला जाणवून गेले. .
माझी मानसपूजा सफल झाल्याचा आनंद वर्णनातीत होता. गुरू राया! आजकाल मला अशी ब-याच वेळा तुझ्या असण्याची जाणीव करून देतोस रे! कधी सुगंधी चंदनाच्या गंध.. कधी केशरी. विलेपनाचा गंध… सुवासिक चाफ्याचा..तर कधी धुंद मोग-याचा… कधी तुला अर्पिलेल्या को-या रेशमी वस्त्रांचा … मन गाभारा. तुझ्या असण्याने. अस्तित्वाने अगदी कृतकृत्यतेने भरून जातो.
एक शक्तिशाली ऊर्जेचा संचार तनमनांत होऊ लागतो. जी दिवसभर उत्साह.. आनंद.. ताजेपणा प्रदान करते. दुपटीने काम .. कर्तव्य करवून घेते. तुझ्या असण्याने एक मजबूत आधार मिळतो. . धीर मिळतो. कमालीचा आत्मविश्वास निर्माण होतो. संकटांना तोंड देण्याची ..त्यांतून मार्ग काढण्याचा अद्भुत मार्ग दिसू लागतो.
गुरू देवा! तुझे असणे मला सुंदर देखण्या सुगंधी फुलांत जाणवते.. नील गगनात उडणा-या पक्षांत जे उच्च ध्येय ठेवून उंच उडान भरण्याची प्रेरणा देतात.. वृक्ष वेली.. फळभारांनी वाकलेल्या तरूवरांत दिसते जे नम्रतेचा संदेश देतात. ..अखंड वहाणा-या नद्यांत तू दिसतोस जे जीवन प्रवाही ठेवण्याचा संदेश देतात .साचलेपणात प्रगती खुंटते न! रंगीबेरंगी फुलपाखरे.. जी स्वच्छंद.. आनंदाने विहरतात. . नि दुस-यालाही आनंद देतात. गवत फुले.. विविध रंगी प्राणीपक्षी…या सगळ्यांत तू असतोस रे! विविध रंगांनी तूच आमचे जीवन आनंद रंगांनी भारून टाकतोस.तू म्हणजेच जीवन.. तू म्हणजेच संजीवन..
गुरू देवा तूझ्या असण्याने..तुझ्या अस्तित्वाने… घरातील वातावरण आनंदी प्रसन्न रहाते. . नामस्मरण.. संकीर्तन.. स्तोत्र पठण… यामुळे एक पवित्र..मंगल.. शुभ ..ऊर्जा.. सकारात्मक ऊर्जा… घरांत तनमनांत फिरत रहाते. सकारात्मक विचारांनी प्रगल्भता.. प्रगती.. नक्कीच होते.
तूझे असणे माझ्यासाठी . . संसारासाठी… एक विश्वास आहे…एक आधार स्तंभ आहे.. एक तेजोमय शक्ती आहे.. एक ऊर्जा आहे… तूच माझे आनंद निधान आहे… एक भक्तीमय भावना आहे..एक अतूट श्रद्धा आहेस. तूच माझा गुरू..तूच माझा कल्पतरू.. तूच माझा पिता.. तूच माझी माता.. तूच माझा सखा ..तूच माझा विधाता! अगदी खरंय हे! तुझ्या अस्तित्वाने माझे जीवन भारलेले आहे.
प्रार्थना तुला गुरूदेवा ही
तू सदा जवळी रहा
मी जिथे जाईन तेथे प्रेमदृष्टीने पहा.
सौ. मंजिरी अनसिंगकर नागपूर.