You are currently viewing “परशुराम भूमीतील परशुरामाचे हार्दिक अभिनंदन”…

“परशुराम भूमीतील परशुरामाचे हार्दिक अभिनंदन”…

हल्ली तसा पुरस्कार हा शब्द वापरताना फारच भीती वाटते याच कारण पुरस्कार ही संकल्पना दिवसेंदिवस एका वेगळ्याच चर्चेचा विषय झालेला आहे.जीवनगौरव, महाराष्ट्र भूषण,समाजभूषण अशा अनेक नांवाने अनेक पुरस्कार अनेकांना जाहीर झालेले आपण पहातो…ऐकतो..आणि आश्चर्यचकीतही होतो.काही पुरस्कार तर म्हणे असे असतात..की काही संस्था या अमुक तमुक एक रक्कम भरायला सांगतात आणि मग त्याबदल्यात जीवनगौरव सोबत एक चकचकीत सर्टिफिकेट, सुंदर मोमेंटो आणि शाल पांघरली जाते..काही पेपरमध्ये बातमी येते …आणि मग असे “पुरस्कार विजेते”समाजात दिमाखात वावरत असतात… पण या गोष्टीला छेद देणाऱ्या आणि मनाला मनस्वी आनंद देणाऱ्याही घटना घडत असतात… आपलं सारं आयुष्य एका ध्येयाने प्रेरीत होवून वेचणाऱ्या, समाजाला दिशा देणाऱ्या,सतत उर्जा देणाऱ्या,आपलं गावं,आपला तालुका,जिल्हा, राज्य आणि देशाचाही गौरव वाढविणाऱ्या अनेक आसामी आपापल्या क्षेत्रात काम करत असतात… ना त्याना अपेक्षा असते सन्मानाची ना पुरस्काराची… पण अशी एक अद्भुष्य शक्ती तटस्थपणे अशा कर्मयोग्यांचे मुल्यमापन करत असते…आणि योग्य वेळ येताच त्यांचा उचीत सन्मान होतो.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मभूषण, पद्मश्री अशा अनेक पुरस्कारांची भारत सरकारने घोषणा केली..या सगळ्यांचेचं त्या त्या क्षेत्रात एक वैशिष्ट्यपूर्ण योगदान आहे…या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन… पुरस्कार प्राप्त महान आसामींच कार्य देश सदैव स्मरणात ठेवील.
या यादित जी दोन नावं आहेत त्यापैकी दोनही पद्मश्रीना भेटण्याचा सौभाग्य मला लाभलं.त्यापैकी एक म्हणजे अनाथांच्या माऊली आदरणीय सिंधुताई सपकाळ आणि दुसरे म्हणजे आमचे सिंधुदुर्गचे सुपूत्र आदरणीय परशुराम गंगावणे.देशभर प्रसिद्ध असलेल्या कळसुत्री बाहुल्यांचा खेळ आणि आपलं सारं आयुष्य ज्या पारंपरिक कलेच जतन,संवर्धन करण्यासाठी खर्च केल..त्या आदरणीय गंगावणेना भारत सरकारने पद्मश्रीने सन्मानित केल.ही अवघ्या सिंधुदुर्ग वासियांसाठी अतिशय गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट आहे…
परशुराम भूमीच्या या परशूरामाचे मनःपूर्वक अभिनंदन…
… अँड.नकुल पार्सेकर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + 11 =