वाढीव वीज बिलाबाबत राज्य सरकारच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करा ….

वाढीव वीज बिलाबाबत राज्य सरकारच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करा ….

मालवण पोलिस अधिकारी शितल पाटील यांना तालुका अध्यक्ष विनोद सांडव, अमित इब्रामपूरकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर

मालवण

वाढीव वीज बिलाबाबत युटर्न घेणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि राज्य सरकारच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करा असे आदेश मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना दिलेत आहेत.या आदेशनानंतर मालवण पोलिस ठाणे येथे पोलिस अधिकारी शितल पाटील यांना तालुका अध्यक्ष विनोद सांडव यांच्या नेतृत्वाखाली ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि राज्य सरकारच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करा यासाठी निवेदन दिले. यावेळी मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, तालुका सचिव विल्सन गिरकर,शहर उपाध्यक्ष विशाल ओटवणेकर, विजय पेडणेकर,गोपाळ कदम,निखिल गावडे, प्रतीक कुबल आदी उपस्थित होते.

वाढीव वीज बिल कमी व्हावे यासाठी राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांनी खळखट्याक आंदोलन देखील केले होते.स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ही वाढीव वीज बिल मुद्द्यावर राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांची भेट घेतली होती.

चार दिवसापुर्वी दिवसांपूर्वी वीज बिल थकबाकी वसुल करा आणि जे थकबाकी देणार नाहीत त्यांची वीज खंडित करा असा आदेश ऊर्जा विभागाने दिले आहे त्या नंतर मनसे आक्रमक होत मालवण मध्ये वीजवितरण कार्यालयात अधिकाऱ्यांना वीज न कापण्याबाबत निवेदन दिले होते.
आज तालुका मनसेने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,करोनाच्या महामारीमुळे देशभरात आणि विशेषत: महाराष्ट्रात दि. २२ मार्च २०२० ते ८ जून २०२० दरम्यान अतिकठोर टाळेबंदी होती. या काळात महावितरण कडुन ना वीज मिटर रिडिंगसाठी प्रतिनिधी पाठविण्यात आले ना वीज देयके वितरित करण्यात आली. घरातच बंदिस्त झालेल्या जनतेला या कालावधीतल्या वीज वापरासाठी महावितरण कंपनी कडुन अचानक वापरपेक्षा तिप्पट-चौपट रकमेची अवाजवी व भरमसाठ वीजबिले पाठवली गेली. या वीजबिलांचे आकडेच इतके मोठे होते की ग्रामिण भागातील गोरगरीब जनतेसह शहरातील मध्यमवर्गीयांनाही भोवळच आली ! करोना टाळेबंदीच्या दिवसांमध्ये व्यापार – उद्योग बंद होऊन असंख्य लोक बेरोजगार झालेले असताना आणि अनेकांच्या पगारात २५ ते ५० टक्के कपात झाल्यामुळे उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाले असताना वीजबिलांची भरमसाठ रक्कम भरणं बहुसंख्य नागरिकांना शक्यच नव्हतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह इतरही राजकीय पक्षांनी नागरिकांमधील संतापाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे आणि ऊर्जामंत्री श्री. नितीन राऊत यांच्याकडे वीजबिलांबाबतच्या तक्रारी मांडल्या. त्यानंतर ऊर्जामंत्री, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि वीज कंपन्यांचे प्रमुख अधिकारी यांच्यात अनेकदा बैठकाही झाल्या. प्रत्येक बैठकीनंतर “वीजबिलात कपात करण्याबाबतचा निर्णय लवकरच घेऊ आणि नागरिकांना दिलासा देऊ” असं आश्वासन उर्जामंत्र्यांनी दिलं. तशा बातम्या सर्व प्रमुख वृत्तवाहिन्या आणि दैनिकांमध्ये प्रसिद्धही झाल्या होत्या.
ऊर्जामंत्री आपल्या शब्दाला जागतील आणि त्यांच्यामुळे वीजबिलांत कपात होऊन करोना संकटकाळात थोडासा आर्थिक दिलासा मिळेल, या आशेवर राज्यातील नागरिक असताना ऊर्जामंत्र्यांनी अचानक घुमजाव केलं आणि “प्रत्येक वीजग्राहकाला वीजबिल भरावेच लागेल” असं फर्मान काढलं. वीज बिल – सरकारी आश्वासन आणि ग्राहकांचा विश्वासघात- घटनाक्रम
१ ऑगस्ट २०२० महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने वाढीव वीजबिलांबाबत ऊर्जामंत्री श्री. नितीन राऊत यांची भेट घेतली. “केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करुन वीजबिलांमध्ये सवलत देण्यासाठी अनुदानाची मागणी करणार व वाढीव बीलामध्ये सुट दिली जाईल ” असं आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी यावेळी दिलं. २९ ऑगस्ट २०२० महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री.राजसाहेब ठाकरे यांनी राज्यपाल श्री.भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन अवाजवी वीजबिलांबाबत सविस्तर चर्चा केली. २६ सप्टेंबर २०२० महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने ऊर्जा सचिव श्री.असीम गुप्ता यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये त्याना महाराष्ट्र वीज नियामक मंडळाच्या दि. महाराष्ट्र राज्य विध्युत नियामक आयोगाकडून दि.९ मे २०२० रोजी सर्व वीज कंपन्यांना प्रॅक्टिस डायरेक्शन द्वारे ग्राहकांना कोविड-19 लॉकडाऊन कालावधीमधील वीज देयका बाबत केलेले स्पष्टीकरण निदर्शनास आणुन दिले व त्यावेळी ऊर्जामंत्री करोनाबाधित होते व ऊर्जामंत्री कार्यालयात रुजु झाल्यानंतर त्यांच्यासोबत मनसेचे शिष्टमंडळ आणि सर्व वीज कंपन्यांचे प्रमुख यांची या विषयी संयुक्त बैठक घेऊ, असं आश्वासन श्री.असिम गुप्ता यांनी दिलं.
३ नोव्हेंबर २०२० करोनाकाळातील वाढीव वीजबिलांमध्ये सवलत देऊन ‘दिवाळीची गोड भेट’ देण्याचे संकेत राज्यातील जनतेला प्रसार माध्यमांद्वारे ऊर्जामंत्री श्री.नितीन राऊत यांनी दिले.
१७ नोव्हेंबर २०२० पंधरा दिवसांच्या आतच ऊर्जामंत्री श्री.नितीन राऊत यांनी घूमजाव केलं. “वीजग्राहकांना कोणतीही सवलत मिळणार नसून मीटर रिडिंगप्रमाणे वीजबिल भरावंच लागेल” असं राज्यातील नागरिकांचा विश्वासघात आणि फसवणूक करणारं वक्तव्य त्यांनी केलं.
२० जानेवारी २०२१ ग्राहकांना वीजबिलात सवलत देण्यास महावितरणने नकार दिला आणि थकीत वीजबिल असणा-या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्याचे आदेश दिले. गेल्या सहा महिन्यांतील आश्वासनं आणि विश्वासघाताचा हा घटनाक्रम लक्षात घेतला तर राज्यातील जनतेची आर्थिक फसवणूक कशी करण्यात आली, हे लक्षात येईल. राज्यातील नागरिकांना – ग्राहकांना अवास्तव अशी भरमसाठ वाढीव वीजबिलं पाठवणे, वीजबिलांमध्ये दिलासा देण्याचं खोटं आश्वासन देऊन सर्वसामान्य जनतेला महिनोनमहिने झुलवत ठेवणं आणि शेवटी राज्यातील सर्वसामान्य जनतेला वीज खंडित करण्याच्या धमक्या देऊन बेहिशोबी वीजबिलांची रक्कम वसूल करणे ही केवळ राजकीय आश्वासनाची फसवणूक नाही, तर वीज कंपन्यांशी संगनमत करुन करण्यात आलेली जनतेची आर्थिक लूट आहे.ह्यामुळे राज्यातील गोरगरीब जनता भयभित झाली असुन प्रचंड मानसिक आघात व क्लेश पोहोचला आहे, याची सर्वस्वी जबाबदारी आर्थिक लुबाडणुकीचा कट रचणारे राज्याचे ऊर्जामंत्री श्री.नितीन राऊत यांच्यासह महावितरण कंपनीचे प्रमुख अधिकारी यांच्याविरोधात फसवणुक व मानसिक आघात पोहोचण्याचा फौजदारी गुन्हा’ दाखल करावा, ही विनंती असे म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा