You are currently viewing जम्नी इकूचो धंदो

जम्नी इकूचो धंदो

*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक “भोवतालकार” साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट-९*

 

*जम्नी इकूचो धंदो*

 

काकल्या आज शांतपणे घरी आला होता. काहीतरी गूढ विचारात होता. बसल्या बसल्या मला त्याने विचारले,”तुका टायम हा?” मी म्हणालो, “का रे ?”

“तू आणि मी येक धंदो करया.”

“कसला रे धंदा?”

तर म्हणाला,”जम्नी इकूचो धंदो.”

मी हसलो, तर गंभीर होत म्हणाला,

“अरे मस्करी नाय खराच. सद्या बिन भांडवली आणि तेजीत चलणारो असो ह्योच धंदो आसा.”

मी अधिक विचारण्यासाठी विचारले, “म्हणजे निश्चित काय करायचं?” तर काकल्या म्हणाला,”मी सातबारे काडून हाडतय. तुया त्येचो अर्थ लाय. पोटहिस्सो, फेरफार लय झेंगटा आसतत तेच्यात. तेच्यातले वाटेकरी तुया सोदून काड, म्हंजे झाला.”

“पण मलाही सातबारा समजत नाही.”

“मगे येकाद्या लिटायर तलाठ्याक धर. तलाठी आणि वकिल या दोघांकाच ह्या काय ता समाजता. वकील आपणाक परवाडाचो नाय. त्येवा तलाठ्याक धरया. अरे, ह्या धंद्यात दोन टक्के कमिशन हा म्हंतत, पण येक टक्को मिळलो तरी काय वाईट नाय.”

काकल्या थांबून परत म्हणाला,” तुका इस्कटून सांगतय. म्हंजे जेंच्ये गावात जम्नी हत, पून ज्येनी गाव सोडलोहा; त्येंका सोदायचा, बोलावचा आणि जमीन इकूक तयार करूचा. घेणारे आसतच. त्येंका पैशे मेळतले. ज्येच्या ताब्यात जमीन हा तेकाय पैशे मेळतले. तलाठी, एजंट अरे सगळ्याकाच पैसो मेळतलो. पूरो समाज वरतेन काडूचो ह्यो धंदो हा. हाली लोकांका तसा काम नकोच झालाहा, पून पैसो होयो हा. पैशाची अशी व्हावती गंगा राजकारण सोडल्या आणखीन खडेच नाय. इकास इकास हूनतत तो ह्योच मरे.”

काकल्या असा विचार करेल असं वाटलं नव्हतं. मग मी विचारलं,” खरंच तुझं असं मत आहे?”

“अरे येडो आसस काय? मी भूमिपुत्र आसय. आपल्या आवशीक दुसऱ्याच्या घश्यात कसो घालीन मी? फकस्त तू साधारण खडे आसय ह्या जरा चाचपी होतय. अरे लोक खुळावलेत. ह्या बग, गावातलो कोनय शाणो हेच्यात पडलो, तरी आपून पडूचा नाय. जमात तितको इरोध करूचो. बस, अरे ह्यो जम्नी इकूचो धंदो नसान, ‘गावाक भिकेक लावचो धंदो हा.” काकल्या निघायला उठला,जायला निघाला. ‘पैशाने गरीब असलेल्या श्रीमंत मालवणी माणसाचा ताठ कणा त्याच्या फाटक्या शर्टातून मला स्पष्ट दिसत होता.’

 

*विनय सौदागर*

आजगाव, सावंतवाडी

9403088802

प्रतिक्रिया व्यक्त करा