साटेली-भेडशीत शासकीय जमिनीत बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाच्या विरोधातील उपोषणस्थळी ॲड. बापू गव्हाणकर यांची भेट

साटेली-भेडशीत शासकीय जमिनीत बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाच्या विरोधातील उपोषणस्थळी ॲड. बापू गव्हाणकर यांची भेट

योग्य तो न्याय मिळवून देऊ; ॲड. बापू गव्हाणकर यांची उपोषणकर्त्यांना ग्वाही

सिंधुदुर्गनगरी

साटेली-भेडशी येथील शासनाच्या जमिनीतील बेकायदेशीर गौण खनिज यामध्ये उचित कारवाई करावी यासंदर्भात साटेली भेडशीतील ग्रामस्थांनी तालुका स्तरावर दोडामार्ग तहसीलदार, नायब तहसीलदार यांना अनेक वेळा निवेदने देऊन सुद्धा कारवाई झाली नाही. त्यानंतर तेथील ग्रामस्थांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना साटेली-भेडशीतील अनधिकृत गौण खनिज खाणींवर योग्य ती कारवाई करा याबाबतचे निवेदन दिले. दरम्यान गेल्या पाच महिन्यात जिल्हाधिकारी यांच्याकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. यासाठी साटेली-भेडशीतील ग्रामस्थांनी आज प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली. या ठिकाणी प्रसिद्ध कायदेतज्ञ ॲड. बापू गव्हाणकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन योग्य ती कारवाई करू अशी ग्वाही दिली.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, दोडामार्ग तालुक्यात साटेली-भेडशी येथे शासनाची कायदेशीर परवानगी नसताना येथील माळरानावर गौण खनिज खाणी सुरू आहेत. त्यामुळे येथील शेतकरी वर्गाची गुरे चारण्यासाठी समस्या निर्माण झाली. त्याचबरोबर शेतकऱ्यांची काही गुरे सदर बेकायदेशीर खाणी मध्ये पडून मृत्युमुखी पडली. या सर्व समस्या यासंदर्भात येथील ग्रामस्थांनी दोडामार्ग तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्याकडे धाव घेतली. मात्र, काहीही उपयोग झाला नाही. त्यानंतर येथील ग्रामस्थांनी गौण खनिज उत्खननांमध्ये तसेच काही अधिकारी चौकशीत चुकीच्या माणसांना पाठीशी घालीत आहेत, याबाबत उचित कारवाई करण्यात यावी. अशी मागणी गेल्या पाच महिन्यापूर्वी दि. १४ जुलै २०२० रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी देखील अजून पर्यंत ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे साटेली-भेडशी तील सुमारे ३० ग्रामस्थांनी आज २६ जानेवारी २०२१ प्रजासत्ताक दिनापासून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली. दरम्यान या उपोषणस्थळी प्रसिद्ध कायदेतज्ञ ॲड. बापू गव्हाणकर यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांना योग्य ती कारवाई करू असे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा