You are currently viewing ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाला ‘नॅक’कडून ‘अ’ दर्जा

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाला ‘नॅक’कडून ‘अ’ दर्जा

*’एमआयटी एडीटी’ विद्यापीठाला ‘नॅक’कडून ‘अ’ दर्जा*

पुणेः

एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ (एमआयटी एडीटी), विश्वराजबाग, लोणी-काळभोर, पुणेला ‘नॅक’कडून NAAC (National Assessment and Accreditation Council) पहिल्याच चक्रात पुढील पाचवर्षांसाठी ‘अ’ (A) (सीजीपीए ३.११ पैकी ४.० स्केल) दर्जा मिळाला आहे. ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाच्या गुणवत्तेवर उमटलेली ही अभिमानास्पद मोहर आहे, अशी भावना विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनिता मंगेश कराड (Executive Director Dr.Sunita Mangesh Karad) यांनी व्यक्त केली.

एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. डॉ.कराड बोलत होत्या. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ.राजेश एस., प्र.कुलगुरू डॉ.रामचंद्र पुजेरी, डॉ.मोहित दुबे, कुलसचिव डॉ.महेश चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कुलगुरू प्रा.डॉ.राजेश एस. यावेळी म्हणाले, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे मूल्यांकन करण्यासाठी नॅक समितीने १०, ११ आणि १२ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाला भेट दिली. अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, पायाभूत सुविधा, गुणवत्ता, संशोधन व व्यावसायिक कृतिशीलता, विद्यार्थ्यांचे नोकरी व व्यवसायाचे प्रमाण, समाजातील वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोचविण्याचे प्रयत्न अशा विविध निकषांवर आधारित मूल्यांकन करुन समितीने ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाला पाच वर्षांसाठी ‘अ’ दर्जा प्रदान केला.

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरण (एनईपी) लागू होण्याच्या आधीपासूनच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर (हॉलिस्टिक डेव्हलपमेंट) भर देत कौशल्यात्मक, गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान केले जाते. ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात होणारे मुलभूत गुणवत्तापूर्ण संशोधन, नवीन शैक्षणिक (NEP) धोरणाच्या अंमलबजावणीसाठी घेतलेला पुढाकार आणि विद्यापीठ व उद्योगक्षेत्र यांच्या परस्पर संबंधातून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालेल्या रोजगाराच्या अनेक संधी याचा ‘नॅक’ समितीने विशेष गौरवाने उल्लेख केला, अशी माहिती देखील कुलगुरू प्रा. डॉ.राजेश एस. यांनी दिली.

*चौकट*
*प्रा. डॉ.विश्वनाथ दा. कराडांचे बहुमोल मार्गदर्शन*
यावेळी बोलताना कुलसचिव प्रा.डॉ. महेश चोपडे म्हणाले, राज्यात खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांची गरज ओळखून विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा.कराड यांनी कोथरूड येथे १९८४ साली राज्यातील पहिल्या खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर २०१५ साली प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि प्रा. डॉ.मंगेश तु.कराड यांच्या सक्षम नेतृत्वात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानासोबतच कला आणि डिजाईन क्षेत्राचे शिक्षण मिळावे यासाठी दिवंगत अभिनेते राज कपूर यांचा कित्येक वर्ष सहवास लाभलेल्या विश्वराजबागेत एमआयटी एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाची (MIT-ADT) स्थापना करण्यात आली. मर्चंट नेव्ही, एरोस्पेस इंजिनिअरिंग, डिजाईन, व्यवस्थापन, संगीत, नृत्य, नाटक, अन्नशास्त्र (Food Technology), नागरी सेवा परीक्षा (UPSC, MPSC), कायदे, वैदिक शास्त्र, मानवशास्त्र आदी अभ्यासक्रमांचे शिक्षक देणारे एक वैशिष्ट्यपूर्ण विद्यापीठ म्हणून ‘एमआयटी एडीटी’चा नावलौकिक सर्वत्र आहे.

*कोट*
क्युएस विद्यापीठ क्रमवारीत १५१-२०० अशी मिळालेली प्रभावी रँक बँड, एनआयआरएफमध्ये मिळालेले मानांकन, यासह आता नॅकने पहिल्याच चक्रात दिलेला ‘अ’ दर्जा या गोष्टीं विद्यापीठाच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवणाऱ्या आहेत. एमआयटी एडीटी विद्यापीठाचे विद्यार्थी आज जगभर विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यांचे बहरलेले कर्तृत्व हीच ‘एमआयटी एडीटी’च्या कार्याची खरी पावती आहे.
– *प्रा. डॉ.मंगेश कराड, कार्याध्यक्ष, एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे* .

प्रतिक्रिया व्यक्त करा