महाराष्ट्र कर्जदार जामिनदार हक्क बचाव संघर्ष समितीचे सावंतवाडीत कार्य सुरू

महाराष्ट्र कर्जदार जामिनदार हक्क बचाव संघर्ष समितीचे सावंतवाडीत कार्य सुरू

तालुक्यातील पायाभूत कार्यकारिणीची स्थापन

सावंतवाडी :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊननंतर उद्भवलेली सभोवतालची परिस्थिती पाहता कर्जदारांबरोबरच बेरोजगार तरूणांच्या आर्थिक समस्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. शासकीय विशेषतः खाजगी बँका, कर्ज देणाऱ्या संस्था कर्ज परातफेडीसाठी अत्यंत खालच्या स्तराला जाऊन सामान्य कर्जदाराला वेठीस धरत आहेत. या शोषित कर्जदाराला हक्काचा आधार देण्यासाठी महाराष्ट्र कर्जदार जामिनदार हक्क बचाव संघर्ष समिती सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर यांनी केले.

महाराष्ट्र कर्जदार जामिनदार हक्क बचाव संघर्ष समितीच्यावतीने सालईवाडा येथे बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी अविनाश पराडकर, दीपक कुडाळकर, डॉ. कमलेश चव्हाण, सादिक डोंगरकर, मिलिंद केळुसकर, वेंगुर्ला सचिव गितेश शेणाई आदी मान्यवर उपस्थित होते. ॲड. करंदीकर पुढे म्हणाले, महाराष्ट्र कर्जदार जामिनदार हक्क बचाव संघर्ष समिती या संघटनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सन २००७ सालापासून कार्य करीत आहे. जिल्ह्यातील युवकांना रोजगार विषयी मार्गदर्शन करणे, त्यासाठी योजना आणि बँका यांच्या चक्रव्यूहातुन बाहेर येण्यात मदत करणे आदींसाठी समिती कार्य करीत आहे.

यावेळी सावंतवाडीत युवा वर्ग एकत्र येऊन नूतन सावंतवाडी तालुका कार्यकारीणी तयार करण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला. तसेच तालुक्याची पायाभूत कार्यकारिणीची स्थापन करण्यात आली. सावंतवाडी अध्यक्ष राजेश साळगावकर तर तालुका संघटक पदी उमेश सावंत यांनी यांची नेमणूक करण्यात आली. यावेळी गरजवंत नागरिक उपस्थित होते. तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील कर्जदार किंवा जामीनदारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होत असल्यास त्यांनी संपर्क साधण्याचा आवाहन यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर, मोबाईल क्रमांक 7774998599 यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा