*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तुला काही कळत नाही…*
घरोघर बाईला रोज ऐकावे लागते..
तुला काही कळत नाही,
मग मला सांगा इतक्या जुन्या काळी
शिवबाला कशी घडवते मग जीजाई?…
पाठीला बांधून दामोदर..
तटावरून घोडा फेकते झांशीची लक्षुमी,
महिलांची सेना उभी करते धटिंगण इंग्रजांसमोर
एक आई…
तरी ही म्हणतात, तुला काही कळत नाही…
ना नवऱ्याची साथ ना सासूची, दारू पिऊन रोज
कुस्करतो पाजी, तरी ही शेतातून येतांना चुलीला
सरपण आणायला विसरत नाही…
तरी ही म्हणतात, तुला काही कळत नाही…
दिवसभर शेतात राबून, खडबडीत हातांनी, ज्यांना तेल ही मिळत नाही, त्याच हातांनी चूल
पेटवत थकला भागला जीव थपाथपा भाकरी
थोपटतो घाई घाई…
तरी ही म्हणतात, तुला काही कळत नाही…
अरे, तिने थोपटली नाही भाकर तर अन्नाचा
घास ही तुम्हाला मिळणार नाही, लेकरांचं हागूमुतू काढून पहा एक दिवस मग कळेल
छाती एवढं वाढवणं सोपं नाही…
तरी ही म्हणतात, तुला काही कळत नाही….
अरे, असे कोणते अकलेचे दिवे पाजळता रोज?
बाई बाटली शिवाय तुमचं भागत नाही, तुमचं
बरबटलेपण ह्याच समाजाच्या भीतीने, नाईलाज
म्हणून स्वीकारते बाई…तुम्हाला तोंडावर न पाडता उजळमाथ्याने वावरू देते ती बाई…
तरी ही म्हणतात, तुला काही कळत नाही…
एकदा तरी प्रसव वेदनांचा अनुभव व त्या नंतरचे
तिचे बदललेले आयुष्य, तुम्हाला मिळायला हवे होते,जे तुम्हाला कधीच कळणार नाही…
अहो, तुम्हाला खरंच काही कळत नाही…
त्या साठी व्हावे लागते बाई….
इतके दिवस राहून आली अंतराळात..
एकाची ही हिंमत होणार नाही..
तरी ही म्हणणार का?…
तुला काही कळत नाही…..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)