*सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमुळे अनेक रोजगार व उद्योजक निर्माण करता आले; बँकेला यावर्षी ११६.४८ कोटी ढोबळ नफा*
सिंधुनगरी :
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची उलाढाल यावर्षी ६०९४.७५ कोटी पर्यंत पोहचली असून या जिल्हा बँकेने आपल्या आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावत नेला आहे. ३१मार्च रोजी संपलेल्या वर्षात ठेवी मध्ये ३६०.३३ कोटींची वाढ, कर्जामध्ये ३४३.५३ कोटींची वाढ तर तब्बल ७०३.८६कोटीची व्यवसायातील वाढ केली आहे. या बँकेने ११६.४८ कोटी ढोबळ नफा मिळवत सिंधुदुर्ग जिल्हा बँक आपली बँक म्हणून जिल्हा वासीय ग्राहकांच्या मनात विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. व या जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक उद्योजक व व्यावसायिक निर्माण झाले अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी याने ओरोस येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मार्च अखेर वर्ष पूर्तीनंतर गेल्या तीन वर्षाच्या काम केल्यानंतर जिल्हा बँकेने केलेल्या ऐतिहासिक कामाची व वाढवलेल्या व्यवसायाची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी यानिमित्ताने दिली. केंद्रीय मंत्री नारायण राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जिल्हा बँकेचे तज्ञ संचालक आमदार नितेश राणे ,आमदार निलेश गाणे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली बँकेचे अधिकारी कर्मचारी व बँकेच्या कार्यकारी संचालक मंडळाने या दोन वर्षात केलेले काम व वाढविलेला व्यवसाय ऐतिहासिक ठरेल असाच आहे असेही त्यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे संचालक दिलीप रावराणे प्रकाश मोर्ये,आत्माराम ओटवणेकर, सौ.प्रज्ञा ढवण, गणपत देसाई,रविंद्र मडगांवकर ,बँकेचे प्रत्येक विभागाचे सरव्यवस्थापक आदी मान्यवर उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बँक असून, या बँकेच्या जिल्हयामध्ये ९८ शाखा कार्यरत आहेत. बँकेमार्फत नियमित बँकिंग सेवांसह RTGS/NEFT, ATM, Mobile App, IMPS, UPI, E-com, QR-Code, ABPS, BBPS, Micro ATM. CTS, E-mail Account Statement इत्यादी आधुनिक बँकिंग सुविधा पुरविण्यात येत आहेत. जिल्हा बँकेने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षअखेर बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावताना ठेवी, कर्जे, एकूण व्यवसाय, स्वनिधी, कर्जवसुली, ढोबळ व निव्वळ नफा इत्यादीमध्ये लक्षणीय प्रगती केलेली आहे.
कोणत्याही वित्तीय संस्थेच्या यशस्वीततेचे मोजमाप हे त्या संस्थेच्या विविध आर्थिक मापदंडावरून निश्चित होत असते. दि.३१ मार्च, २०२५ अखेरील खालील आकडेवारीवरून बँकेच्या आर्थिक प्रगतीचा चढता आलेख निदर्शनास येत आहे.
बँकेच्या इतिहासात दुस-यांदा रू.१०० कोटीच्यावर बँकेचा ढोबळ नफा गेलेला आहे. मागील दि.३१ मार्च, २०२४ अखेर बँकेचा ढोबळ नफा रू.१००.५९ कोटी एवढा होता. त्यामध्ये रू.१५.८९ कोटीने वाढ होवून दि. ३१ मार्च २०२५अखेर बँकेचा ढोबळ नफा रू.११६.४८ कोटी एवढा झालेला आहे. तर बँकेचा निव्वळ नफा दि.३१/०३/२०२४ अखेर रू.२६.००कोटी होता. त्यामध्ये रू.९.००कोटीने भरीव वाढ होवून दि.३१/०३/२०२५अखेर बँकेचा निव्वळ नफा रू.३५.०० कोटी एवढा झाला आहे.
दि.३१/०३/२०२४ अखेर बँकेच्या एकूण ठेवी रू.२९७२.७९ कोटी होत्या. त्यामध्ये रू. ३६०.३३कोटीने वाढ होवून दि.३१/०३/२०२५ अखेर एकूण ठेवी रू.३३३३.१२ कोटी एवढ्या झालेल्या आहेत. बँकिंग व्यवस्थेमध्ये ठेवीमधील १०.००% वाढहि चांगली मानणेत येत्.याही पुढे जाऊन बँकेने ठेव वाढीचे प्रमाण १२.१२% एवढे राखले आहे
दि.३१ मार्च, २०२४ अखेर बँकेचा एकूण कर्जव्यवहार रू.२४१८.१० कोटी होता त्यामध्ये रू.३४३.५३कोटीने वाढ होवून दि.३१ मार्च, २०२५ अखेर एकूण कर्जव्यवहार रू.२७६१.६३ कोटी एवढा झाला आहे.
बँकेचा एकूण व्यवसाय मार्च २०२४अखेर रू.५३९०.८९कोटी होता. बँकेने माहे डिसेंबर २०२४ अखेर रू.६००० कोटींचा टप्पा गाठलेला होता. गतवर्षीशी तुलना करता, बँकेच्या एकूण व्यवसायामध्ये रू.७०३.८६ कोटीची भरीव वाढ होवून मार्च २०२५अखेर बँकेचा एकूण व्यवसाय रू.६०९४.७५ कोटी एवढा झालेला आहे. सदर व्यवसाय चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये रू.८००० कोटीच्यावर नेण्याचे बँकेचे उद्दिष्ट आहे.
कोणत्याही संस्थेचे स्वनिधी हे त्या संस्थेचा आर्थिक पाया असतो. स्वनिधीमध्ये बँकेचे भागभांडवल व नफ्यामधून वेळोवेळी उभारलेल्या राखीव व इतर निधींचा समावेश असतो. बँकेने स्वनिधी वाढीसाठी नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. दि.३१ मार्च, २०२५ अखेर बँकेच्या भागभांडवलामध्ये रू.३.१४ कोटी तर राखीव व इतर निधीमध्ये रू.८८.९५ कोटीने वाढ झाली असून बँकेच्या स्वनिधीमध्ये एकूण रू.९२.०९ कोटीने वाढ होवून दि. ३१ मार्च, २०२५ अखेर बँकेचे एकूण स्वनिधी रू.५७६.४५ कोटी एवढे झाले आहेत.
बँकेचे खेळते भांडवल दि.३१ मार्च २०२४अखेर रू.३७३५.९६ कोटी एवढे होते त्यामध्ये रुपये ४३४.३५ कोटी एवढी वाढ होऊन दिनांक३१ मार्च २०२५रोजी बँकेचे खेळते भाग भांडवल रुपये ४१७०.३१ एवढे झाले आहे
बँकेस विविध लेखापरिक्षणांमध्ये दरवर्षी सातत्याने ‘अ’ ऑडिट वर्ग प्राप्त होत आहे.
बँकांकडील ढोबळ एनपीए आदर्श प्रमाण ५% च्या आत असणे आवश्यक असते बँकेचे डोबळ एनपीए प्रमाण दिनांक३१ मार्च २०२५ अखेर ४.१४ टक्के एवढे आहे तर बँकेने निव्वळ एनपी प्रमाण (नेट एनपीए %)सातत्याने ०.००% राखले असून यावर्षी सुद्धा निवळ एनपी प्रमाण ०.००% राहिले आहे बँकेच्या या यशस्वी घोडदौडीमध्ये बँकेच्या सभासद संस्थांबरोबरच बँकेचे संचालक मंडळ त्याचप्रमाणे या बँकेचे अधिकारी/कर्मचारी यांनी परिश्रमपूर्वक केलेल्या प्रयत्नांचा मोठा सहभाग आहे. बँकेचे ठेवीदार/ग्राहक यांचा बँकेवर असलेला विश्वास तसेच कर्जदारांनी कर्ज परतफेडीसाठी केलेले सहकार्य यामुळेच बँकेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे. या सर्वाच्या सहकार्याशिवाय कोणत्याही आर्थिक संस्थेची प्रगती शक्य नसते. आपली जिल्हा बँकही त्याला अपवाद नाही. त्यामुळे जिल्हा बँकेशी संलग्न असलेल्या या सर्व घटकांचे बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त करून बँकेचे यापुढील वाटचालीमध्येही सर्वाचे असेच सहकार्य लाभेल असा विश्वास व अपेक्षा व्यक्त केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपला व्यवसाय वाढविताना जिल्ह्यातील ग्राहकांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर गतिमान बँकिंग सेवा दिली. गेल्या दोन वर्षात ठेवींच्या रकमेत वाढ झाली. कर्ज रकमेतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील जवळपास दोनशेच्या वर नवीन उद्योजक बँकेच्या अर्थशास्त्रातून उभे राहिले आहेत. त्यापेक्षा वाहन कर्जालाही मोठा प्रतिसाद जिल्हा वाशीय ग्राहकांनी दिला आहे. नवनवीन उद्योजक व नवनवीन ग्राहक या जिल्हा बँकेने वाढविले आहेत व सिंधुदुर्ग जिल्हा बँक आपली बँक सिंधुदुर्ग वासियांची बँक म्हणून या बँकेने ऐतिहासिक प्रगती केली आहे याबद्दल आपल्याला समाधान आहे असेही जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी स्पष्ट केले. होते.