कुडाळ मध्ये पोलिस काॅस्टेबलची राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या*
कुडाळ
कुडाळ पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या सुरज अनंत पवार (वय ३१ वर्षे, रा. मळगाव-कुंभार्लीवाडी, ता. सावंतवाडी, सध्या रा. रामेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्स, केळबाईवाडी, कुडाळ) याचा मृतदेह ते राहत असलेल्या रामेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्स मधील फ्लॅट मध्ये सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अस्वस्थेत आढळून आला. तपासाअंती सूरज यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आज दुपारी पावणेचार पूर्वीची हि घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सुरज अनंत पवार हे कुडाळ पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. अलीकडेच काही महिन्यांपूर्वी आवळेगाव आऊटपोस्ट येथून ते कुडाळ पोलीस ठाण्यात हजर झाले होते. ते कुडाळ मधील रामेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्स मध्ये एकटेच राहत होते. आज दुपारी त्याच्या मित्राच्या मोबाईल वर त्यांनी ‘तुला कुडाळला यावेच लागेल, मी जीवन संपवीत आहे’ अशा आशयाचा मेसेज टाकला. त्या मित्राने याची कल्पना त्याचा मळगाव येथील भावाला दिली. ते तातडीने कुडाळला आले. तो राहत असलेल्या फ्लॅटवर गेले असता बाहेरून लॅच लावलेले होते. परंतु किल्ली बाहेर ठेवलेली होती. त्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता सुरज पवार पंख्याला दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले.