कणकवली :
सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड हे ३१ मार्च रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. याच दिवशी त्यांचा वाढदिवसही होता. या औचित्याने त्यांचा सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी मित्रपरिवार आणि कुटुंबियांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी श्री.अजयकुमार सर्वगोड यांनी सिधुदुर्गातील आपल्या अडीच वर्षाच्या सेवाकाळात जिल्हावासियांचे भरभरुन प्रेम आपल्याला मिळाले, बांधकाम विभागातील नोकरी जनसेवा मानून सेवाभावीपणे केल्याचे त्यांनी सांगितले.
अजयकुमार सर्वगोड यांनी सा. बां. विभाग कणकवली येथे कार्यकारी अभियंता म्हणून रुजू झाल्यानंतर तत्कालीन आणि विद्यमान पालकमंत्री तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सकारात्मक दृष्टीकोन ठेवून अनेक जिल्हयात सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. आपल्या मनमिळावू स्वभावाने मोठा मित्रपरिवारही निर्माण केला. सेवानिवृत्ती निमित्ताने श्री. सर्वगोड यांचा सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांबरोबरच मित्रपरिवार आणि हितचिंतकांच्यावतीने त्यांचा यथोचित गौरव करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. सेवानिवृत्तीनंतरची आपली पुढील वाटचाल ही सामाजिक आणि राष्ट्रसेवेसाठीच असणार असल्याचे अजयकुमार सर्वगोड यांनी सांगितले.