बोर्डवे मोराईमंदिर नजिक दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी
कणकवली :
तालुक्यातील बोर्डवे मार्गावर मोराई मंदिर नजिक शुक्रवारी रात्री ८:१० वाजण्याच्या सुमाराला दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून अपघात झाला. या अपघातात बोर्डवे बोगारवाडी येथील अनिल आत्माराम एकावडे ( वय ६०, रा. बोर्डवे बोगारवाडी ) हे गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेत असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाला, असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघात प्रकरणाची फिर्याद नारायण विलास घाडी यांनी कणकवली पोलिसात दिली. त्यानुसार संशयित सचिन मधुकर खरात ( वय ३५, सध्या रा. बोर्डवे सुंदरवाडी -मूळ रा. पोखरण ) याच्यावर रस्त्याच्या विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत अनिल एकावडे हे आपली कणकवली शहरातील चहाचे दुकान बंद करून रात्री ८:१० वा. च्या सुमोर आपल्या ताब्यातील दुचाकी ( एमएच ०७ एएफ ५९४२ ) ने घरी जात होते. त्या दरम्यान बोर्डवे मोराई मंदिर नजिकच्या उतारी तीव्र वळणावर समोरून येणाऱ्या दुचाकीची एकावडे यांच्या दुचाकीला धडक बसली. यात अनिल एकावडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी एकावडे यांना तात्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एकावडे यांना तपासून मयत घोषित केले.
तर संशयित सचिन खरात हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ओरोस जिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे, व अन्य पोलीस कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. अपघाताचा अधिक तपास कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद देठे करत आहेत.
अपघातात मयत झालेल्या अनिल एकावडे यांच्या पाश्चात दोन मुलगे, पत्नी, सून, नात असा परिवार आहे.