You are currently viewing दोडामार्गमधील हत्तींचा वावर शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा, हत्ती पकड मोहीम राबविण्याची मागणी

दोडामार्गमधील हत्तींचा वावर शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा, हत्ती पकड मोहीम राबविण्याची मागणी

दोडामार्गमधील हत्तींचा वावर शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीचा, हत्ती पकड मोहीम राबविण्याची मागणी

दोडामार्ग :

जंगली प्राण्यांचा मुक्त वावर असल्याने मनुष्य आणि वन्य प्राणी यांचा संघर्ष पहायला मिळत आहे. गवा रेड्यांचा हैदोस सुरू असल्याने वाहने, माणसांना ठोकरून जात आहेत. दरम्यान जंगली हत्तींचा धुमाकूळ शेती बागायतीला मारक ठरत आहे. हत्तींचा वावर असल्याने गेल्या साडेतीन वर्षांत २ कोटी ६५ लाख १२ हजार ६३९ रुपयांची नुकसान झाली आहे. वन विभागाने भरपाई मंजूर केली आहे.

कर्नाटक राज्यातील दांडेली अभयारण्यातून हत्ती महाराष्ट्र राज्यातील दोडामार्ग तालुक्यात मांगेली या भागात तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्प या ठिकाणी २५ वर्षांपुर्वी दाखल झाले. वन विभागाकडे सन २००२ पासून हत्ती आल्याची नोंद आहे. मात्र सन २००० मध्ये हत्ती तिलारी धरण प्रकल्प स्थळी पोहोचलो. पुढील काळात तर ते जवळजवळ २२ हत्ती आल्याची नोंद झाली आहे.

या हत्तींचा वावर दोडामार्ग तालुक्यात व कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात वाढला. एका वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहा तालुक्यात हत्तीं पोहोचले होते. या दरम्यान हत्ती पकड मोहीम हाती घेण्यात आली. फटाके फोडून हत्ती पळविले. मात्र चंदगड व दोडामार्ग तालुका हे हत्तींचे केंद्र बनले. चंदगड, तिलारी परिसर व आंबोली या ठिकाणी हत्तींचा वावर आहे. या परिसरात मुबलक खाद्य, पाणी आहे.

गेल्या २५ वर्षात चंदगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात बारा हत्ती मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये तीन पकड मोहीम राबविण्यात आल्यानंतर आणि ९ नैसर्गिक रित्या मृत्युमुखी पडले आहेत. या दरम्यान मनुष्यहानी, शेती बागायती ची नुकसानी कोट्यावधी रुपयांची झाली आहे.

सध्या दोडामार्ग तालुक्यातील शिरवल,कोलझर परिसरात ४ हत्तींचा वावर आहे. या मध्ये हत्ती,हत्तीण,दोन पिल्ले तर सावंतवाडी तालुक्यातील आंबोली परिसरात एक हत्ती आणि चंदगड तालुक्यात दोन हत्ती मिळून ७ हत्तींचा वावर असल्याचे उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांनी बोलताना सांगितले. फणस व काजू बोंडे हे पिक सध्या आले असून हत्तींचे ते खाद्य आहे. त्यामुळे काजू बागायती मध्ये हत्तींचा वावर आहे. तर फणस खाण्यासाठी ते लोकवस्तीत मध्येही जातात. शेतकरी गवा रेड्यांच्या बागायती मधील घुसखोरीला कंटाळले आहेत. त्यातच काही भागात हत्ती पोहचले आहेत.

साडेतीन वषात पावणेतीन कोटींचे नुकसान
वन विभागाने हत्तींनी केलेल्या बागायतीच नुकसानभरपाई मंजूर केली आहे. सन २०२२ ते फेब्रुवारी २०२५ पर्यंत १०८५ प्रकरणात दोन कोटी ६५ लाख १२ हजार ६३९ रूपये शेती पीक व फळ पिकांना मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांनी दिली.

सन २०२२-२३ मध्ये ३३४ प्रकरणात ५६ लाख ३६ हजार ७२० रूपये,सन २०२३-२४ मध्ये ३५५ प्रकरणात ८७ लाख ९० हजार ०७६ रूपये तर सन २०२४-२५ फेब्रुवारी पर्यंत ३९६ प्रकरणात १ कोटी २० लाख ८५ हजार ८४३ रूपये मंजूर झाले आहे. गेल्या साडेतीन वर्षांत २ कोटी ६५ लाख १२ हजार ६३९ रूपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

दोडामार्ग तालुक्यातील सरपंच, ग्रामस्थांनी वारंवार आंदोलने छेडली पण हत्ती हटाव साध्य होत नाही. हत्ती चौपटीने नुकसान करत आहेत, वन विभाग तुटपुंज्या स्वरूपात भरपाई देत आहेत अशा विविध पातळ्यांवर तक्रारी आहेत.

हत्तींचा निर्णय वनमंत्री घेतील…
हत्तींचा वावर वाढला आहे. शेतकरी, सरपंच यांची हत्ती पकड मोहीम हाती घ्यावी अशी मागणी आहे. सरपंच शिष्टमंडळाने कर्नाटकात जाऊन अभ्यास केला आहे. या साऱ्या घटनेची माहिती वनमंत्री यांच्याकडे वन विभाग ठेवणार आहे. हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी वनमंत्री पुढील भुमिका घेतील, असे माजी मंत्री,आमदार दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

वन विभाग सदैव तत्पर…
हत्तींचा वावर असल्याने कायमच हत्तींना नैसर्गिक अधिवासात पाठविण्यासाठी वन विभागाने मोहीम हाती घेतली आहे. तसेच वरिष्ठांना योग्य तो अहवाल सादर केला आहे. या शिवाय पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याबाबत सतत कार्यरत आहोत असे उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांनी बोलताना सांगितले.

हत्तींचा वावर शेतकऱ्यांना तापदायक…
हत्ती आल्यापासून शेती व बागायती सह मनुष्य हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. शेतकऱ्यांची झालेली नुकसानी भरून येणारी नाही. फळांच्या बागायती काबाडकष्ट करून फुलविणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हत्ती पकड मोहीम राबवली पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे, असे प्रगतशील शेतकरी प्रेमानंद देसाई यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा