You are currently viewing निसर्ग वाचविणे काळाची गरज – अर्चना परब

निसर्ग वाचविणे काळाची गरज – अर्चना परब

विद्याविहारमध्ये जागतिक पर्यावरणदिन साजरा

बांदा

कोकण म्हणजे निसर्गाने भरभरून दिलेली नैसर्गिक संपत्ती असून ती आपण जपली आहे. परिसरात होणारी वृक्षतोड थांबवून निदान असलेली झाडे वाचविणे गरजेचे आहे. पुर्वजांनी जी मोठ्या झाडांसभोवताली बांधकाम करून देवाचे प्रतिक निर्माण केले अशा झाडांची तोड होत नाही. पुर्वजांच्या विचारांची दूरदृष्टी आज उपयोगी येत असून ती काळाची गरज बनली आहे. प्रत्येकाने निसर्ग वाचविण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, असे प्रतिपादन युट्यूब सोशलमिडिया फेम मयेकारीन म्हणजे अर्चना परब यांनी केले.

विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस मध्ये पर्यावरण दिनानिमित्त आयोजित ‘एक झाड एक मुल’ उपक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब, प्रभारी मुख्याध्यापक सदाशिव धुपकर, श्रीरंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुमित पाटील, वनश्री फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष संजय सावंत, वटवाघुळ संशोधनकर्ते राहुल खानोलकर, त्यांचे सहकारी श्रीकृष्ण नाटेकर, गौरेश राणे, वन्यजीव संशोधक अमित सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाळा परिसरात मान्यवरांसह विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. यावेळी शिक्षक मोहन पालेकर, सुषमा मांजरेकर, विवेकानंद सावंत, शिपाई उपस्थित होते.

वृक्षारोपणाचे विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे. कारण एका झाडावर अनेक जीव अवलंबून असतात. निसर्ग संवर्धन-संगोपनाची आवड मुलांनी करून घ्यावी. आम्ही दिलेल्या झाडाचे मुल्यमापन करून मुलांना पुढे बक्षिस देणार असल्याचे संजय सावंत यांनी सांगितले. एक मिनिट वीज वाचविल्यास आदिवासी भागातील विद्यार्थी अभ्यास करू शकतील. तसेच एक बादली पाणी वाचवल्यास पाणी बचत होईल. वह्यांचा वापर कमी करत पाट्यांचा वापर केल्यास आपण पृथ्वी वाचवू शकतो असे सुमित पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शिक्षक निलेश देऊलकर यांनी केले तर आभार सदाशिव धुपकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − ten =