सावंतवाडी शहराचा प्रवास नक्की कुठच्या दिशेने?
  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

सावंतवाडी शहराचा प्रवास नक्की कुठच्या दिशेने?

शहरवासीयांनी सत्ताधाऱ्यांवर टाकलेला विश्वास सार्थ ठरतोय का?

विशेष संपादकीय

सावंतवाडी ऐतिहासिक वारसा लाभलेलं सुंदर स्वप्नवत शहर. राजाश्रय लाभलेलं शहर राजकारणात देखील शांत,संयमी,सुसंस्कृतपणाचे दर्शन घडवत वाढत गेलं. गेल्या वीस वर्षांत शहरात आमूलाग्र बदल झाले आणि महाराष्ट्रात शहराने आपले वेगळेपण जपत नावलौकिक मिळवला. सावंतवाडीला आजपर्यंत सुसंस्कृत व्यक्तींचा राजकीय वारसा लाभला आहे. समाजवादी नेते जयानंदजी मठकरांपासून ते प्रविण भोसले, दीपक केसरकरांपर्यंत सर्वच शांत, सुसंस्कृत नेते शहराने पाहिले. नगरपालिकेत देखील विचारवंत, अभ्यासू नगरसेवक, नगराध्यक्ष होऊन गेले. परंतु सावंतवाडीत कधीही हम करे सो कायदा सावंतवाडीकरांनी पहिला नाही. निर्णयांवर चर्चा, वाद व्हायचे परंतु ते सभागृहातच, बाहेर मात्र एकदिलाने सावंतवाडीचा विकास हाच कार्यक्रम राबवला जायचा.
दीपक केसरकरांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात सावंतवाडीचा कायापालट झाला. तलावाभोवती विकास म्हणणाऱ्यांनी सावंतवाडी महाराष्ट्र राज्यात, देशात नावलौकिक मिळवताना पाहिलं. तसाच विकास पुढे आनारोजीन लोबो, पल्लवी केसरकर, श्वेता कोरगावकर, बबन साळगावकार यांच्या काळात देखील पहायला मिळाला. शहरात कधी वाद-विवाद झाले नाहीत की दादागिरी शहरवासीयांनी अनुभवली नाही. अगदी विरोधकांनी देखील तत्वांवर भांडणे केली परंतु कधी कोणावर चिखलफेक केली नाही किंवा कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलले नाहीत. माणसाचे शिक्षण सुसंस्कृतपणा शिकवत नाही तर संस्कार शिकवतात. आणि सावंतवाडी शहराने हेच संस्कार आजतागायत सावंतवाडीत पाहिले.
आजची सुधारीत सावंतवाडी ही शहरवासीयांना अभिप्रेत नाही. सावंतवाडीचे नाव संस्कारांनी नाही तर संगतीने बिघडलेल्या मुलांच्या गैर कृत्यांमुळे जिल्हाभरात, राज्यात गाजत आहे. काही पैशांसाठी हापापलेल्या भांडवलदार गैरधंदे करणाऱ्या लोकांमुळे शहरातील तरुण पिढी बरबाद होत चालली आहे. सत्ताधाऱ्यांच्या कृपेनेच सत्ताधाऱ्यांचेच अनुयायी मटक्याच्या टपऱ्या जागोजागी उभारून सावंतवाडीचा मटक्याचे शहर म्हणून विकास करत आहेत. राजकीय पक्षांचा आश्रय घेत पैशांच्या जोरावर राजकीय पदे पदरात पाडून घेणारे अवैध दारूचे धंदे अगदी बिनधास्त करत आहेत, शहरात जागोजागी, गल्लीबोळात, जिथे बसायला एखादी इमारत, अथवा पडीक जागा असेल तिथे तिथे दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून येतो. शहरात दारू, मटक्याच्या आहारी गेलेली तरुण पिढी पाहिल्यावर सत्ताधाऱ्यांना विचारावस वाटतंय की, “हाच विकास तुम्ही करणार होता का? आणि नाविलाजाने सावंतवाडी वासीयांनाही विचारावेसे वाटते,
यासाठीच तुम्ही सत्ता बदल करण्याचा हट्ट केला होता का?
बबन साळगावकर सारख्या आठ वर्षे भ्रष्टाचाराचे कुठलेही आरोप न लागलेल्या माणसावर चिखलफेक करताना चिखल फेकणार्यांनी स्वतःचा इतिहास, भूतकाळ वर्तमानकाळ तपासून पाहिला आहे का? स्वतःच्या बुडाखाली किती अंधार आहे हे कधी वाकून तरी पाहिलं आहे का? बबन साळगावकार एकवेळ राजकीय निर्णय घेण्यासाठी चुकले असतील, कोणाच्यातरी चढवण्यामुळे दिशा भरकटले देखील असतील, परंतु सावंतवाडीसाठी, आणि सावंतवाडीवासीयांसाठी ते कधीच चुकले नाहीत. निर्णय घेताना त्यांना फक्त राजकीय वैर अथवा सूडाच्या भावनेने कधी विचार केला नाही तर नगरपालिकेच्या भल्यासोबतच शहरवासीय, विक्रेते, गोरगरीब सर्वांचा विचार केला, त्यामुळे शहरात शांतता नांदत होती. गोरगरिबांना अन्नासाठी महाग झाल्यावर एक दोन दिवस दानधर्म करून जगवण्यापेक्षा त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत न की त्यांचे रोजगार हिरावून घ्यायचे.
दीपक केसरकर यांनीच नावारूपाला आणलेले, ज्यांना नेता म्हणून ओळख सुद्धा नव्हती त्यांनी नाराज होऊन, तर काहींनी क्षणिक पैशांच्या लोभापायी केसरकर यांच्याशी गद्दारी करत विरोधकांना निवडणुकीत निवडून येण्यासाठी मदत केली. आज तेच लोक ज्यांना मदत केली त्यांच्या विरोधात रस्त्यावर येत आहेत. त्यांना स्वतः केलेल्या चुकीचा पश्चाताप होत आहे. दगडापेक्षा वीट ही मऊ असतेच. त्यामुळे दगड उचलताना नेहमी विटेचा पर्याय तपासून पहायला हवा. आज एक रवी जाधव उपोषणाला बसला तर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपब्लिकन इत्यादी पक्षांचे नेते त्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर एकत्र आले. परंतु जेव्हा असे समविचारी लोक एकत्र येतील आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठतील तेव्हाच इतिहास घडेल. एकदा मिळालेल्या ५००/१०००/२००० रुपयांनी माणूस मिंदा होतो, अन्यायाविरुद्ध बोलण्यासही त्याच्याकडे शब्द उरत नाहीत, आपलं मत एकदा मिळणाऱ्या पैशांसाठी न विकता योग्य व्यक्तीस दिल्यास कधीही अन्यायाविरुद्ध पेटून उठता येतं.
आज सावंतवाडीतील तरुण वर्गाने सुद्धा विचार करण्याची वेळ आली आहे, क्षणिक दिसणाऱ्या सुखासाठी गैरधंदे करून पैसे मिळविणाऱ्यांच्या पाठीशी राहून त्यांना मोठं करण्यापेक्षा स्वतःच्या आत्म्यास स्मरून स्वतःच्या उज्वल भवितव्यासाठी अवैध धंदेवाल्यांच्या आणि त्याना मोठं करणाऱ्या पक्षांच्या मागे न लागता योग्य त्या दिशेने पाऊल टाकले पाहिजे, आणि बेकायदेशीर, अवैध धंदेवाल्या राजकीय लोकांपासून दूर राहिले पाहिजे. तरुण पिढी समजली, सुधारली तरच सावंतवाडी शहराचं भवितव्य उज्वल आहे, अन्यथा गैरमार्गाला घेऊन जाणाऱ्या राजकारण्यांच्या मागे जर आजचे तरुण गेले तर भविष्यात अंधाराशिवाय काहीच दिसणार नाही.
सावंतवाडी वासीयांनी आजपासूनच जागृत होऊन सावंतवाडीच्या आणि आपल्या मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी शहरात वाढत असलेली दुसऱ्या शहरांतील प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे. दादागिरी, हुकूमशाही वाढत गेली तर सावंतवाडी शहर देखील जिल्ह्यातील अशांत शहर म्हणून ओळखले जाईल यात शंकाच नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा