*ध्येय पूर्तीसाठी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास महत्वाचा- ॲड. उमेश सावंत*
*विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न*
कणकवली
सध्या जगभरात एआय या आधुनिक तंत्रज्ञानाने मोठी भरारी घेतली आहे. उद्याचे जग एआय तंत्रज्ञानाचे असणार आहे. त्यामुळे आतापासूनच आपण त्यादृष्टीने वाटचाल करून त्याचा भाग होणे गरजेचे आहे. त्यासाठी आमचे सहकार्य लाभेल. शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास बाळगला पाहिजे. स्वतःवर आत्मविश्वास असेल तरच कोणत्याही क्षेत्रात यश मिळते. शिक्षणात मेहनतीला पर्याय शोधता नये, जिद्द आणि चिकाटीने अभ्यास केला पाहिजे. तुम्ही जे क्षेत्र निवडले आहे त्यामध्ये स्वतःला वाहून घेऊन ध्येय पूर्तीसाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत. आज विविध स्पर्धांमध्ये तुम्ही पारितोषिके मिळविली आहेत आजचे छोटे छोटे यश तुमच्या पुढच्या मोठ्या यशाची सुरुवात असते. स्नेहसंमेलनाचा आजचा तुमचा आनंदाचा दिवस आहे. असे आनंद तुमच्या जीवनात पुन्हा पुन्हा येत राहोत असे प्रतिपादन ॲड. उमेश सावंत यांनी केले. तसेच अद्यावत असे फार्मसी कॉलेज उभारल्याबद्दल संस्थेचे त्यांनी मनापासून अभिनंदन केले.
युवक कल्याण संघ कणकवली संचलित शिरवल येथील विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेजचे संस्कृती २०२५ वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गातील प्रतिथयश वकील ॲड. उमेश सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. वैभव नाईक यांनी ॲड. उमेश सावंत यांच्या कार्याचा गौरव करत शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. वैभव नाईक यांनी मार्गदर्शन करताना गुणवंत विद्यर्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
यावेळी उद्योजक सुहास गावडे, युवक कल्याण संघ संस्था सचिव डॉ. रमण बाणे,खजिनदार प्रा. मंदार सावंत,मुख्याध्यापक डॉ. राजेश जगताप, नंदिनी नाईक, राजवर्धन नाईक, प्रा. मेघा बाणे,प्रा, डॉ. अमोल उबाळे, प्रा. चंद्रशेखर बाबर,प्रा. अमर कुलकर्णी, प्रा. प्रणाली पांगम, प्रा. स्वरूपा भोकरे, प्रा. प्रीतम राणे, महाविद्यालयाचे स्टुडन्ट कौन्सिल जनरल सेक्रेटरी विवेक परब,महिला सेक्रेटरी आलिया पटेल ,कल्चरल सेक्रेटरी प्रणव कोळी, उर्वी दळवी, कशिश काझी आदींसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.