मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांचे आश्वासन
सिंधुदुर्गनगरी:
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सिंधुदुर्ग यांचे मार्फत शंभर दिवस सात कलमी कार्यक्रमांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापित महिला उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी, काजू महिला उद्योजक, उत्पादक गटाचे प्रतिनिधी यांच्याशी आपल्या दालनात बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन या घटकाअंतर्गत गुंतवणूकदार उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी प्रतिनिधी यांच्या उद्योगाबाबत सद्यस्थिती बाबत माहिती घेतली. तसेच त्यांच्या उद्योगाचा आढावा घेतला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री खेबुडकर यांनी उमेद अभियान अंतर्गत कार्यरत बचत गटाच्या उद्योग करणाऱ्या महिलांचे मी विशेष कौतुक करतो. त्यांना उद्योग व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी, शासकीय विभागामार्फत मिळणारे सहकार्य, तसेच उद्योग वृद्धिंगत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक ते सहकार्य देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. या बैठकीच्या वेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक उदय पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे व मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील, अभियान जिल्हा व्यवस्थापक वैभव पवार उपस्थित होते.
या बैठकीस समर्थकृपा महिला समूह खारेपाटणच्या जागृती पोटले, कोकण रत्न उत्पादक गटाच्या वैशाली गवस, सिंधू सखी महिला उत्पादक कंपनी संचालक श्रेया मोर्ये, क्रांती महिला प्रभागसंघाच्या श्रीमती कुवळेकर, पीएनजी कॅश्युचे संचालक प्रणाली गावडे, आराधना अगरबत्ती समूहाचे तन्वी सावंत, माणगाव प्रभाग संघ अध्यक्ष शबनम नाईक, रियाना शेख इत्यादी महिला उद्योजकांनी उपस्थित राहून आपली उत्पादनाची प्रक्रिया व त्यांचे विपणन याबाबत विस्तृत माहिती दिली.