You are currently viewing फोंडाघाट मध्ये एका रात्रीत २ ते ३ ठिकाणी घरफोडीचा अयशस्वी प्रयत्न

फोंडाघाट मध्ये एका रात्रीत २ ते ३ ठिकाणी घरफोडीचा अयशस्वी प्रयत्न

फोंडाघाटवासियांचा “जागते रहो” चा नारा..

सी.सी.टी.व्ही फुटेज च्या उपलब्धतेमुळे पोलिसांपुढे चोरांना पकडण्याचे आव्हान..

फोंडाघाट

तरळा, वैभववाडी,खांबाळे, कणकवली नंतर चोरांच्या टोळक्यांनी शुक्रवारी रात्री दोन ते तीन चे दरम्यान फोंडाघाट मध्ये, भर बाजारात धुमाकूळ घालत, दोन-तीन ठिकाणी लागोपाठ घरे- दुकाने फोडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे फोंडाघाट पंचक्रोशीत घबराटीचे वातावरण आहे. लगोलग सकाळी ग्रामस्थांनी एकत्र येत आळीपाळीने “जागते रहो” चा नारा देत,गस्त घालत पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज वरून चोरट्यांची टोळी दोन- तीन लोकांची असून, चोरीचा प्रयत्नापूर्वी सी सी कॅमेरे- बंद घरे- दुकाने यांची माहिती गोळा करून नंतरच चोरी केल्याचे निष्पन्न होत आहे. वैभववाडी- खांबाळे- तरळा येथील फुटेजमध्ये व्यक्ती एकच असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.

रात्री २:३० च्या दरम्यान अजित नाडकर्णी यांचे राहत्या घराच्या गोडाऊन चे भागाचा, दरवाजा चोरांनी कडीकोयंडा कापून उघडला. परंतु तिथे काही न मिळाल्याने त्यानी घराचा मुख्य दरवाजा फोडण्याचा प्रयत्न सुरू केला. आवाजाने शेजारील पेडणेकर कुटुंबीय घराबाहेर आले. त्यांनी कोण ? म्हणून विचारतात चोरांनी झऱ्येवाडीकडे पोबारा केला. संतोष टक्के, महेश पेडणेकर रमेश राणे व आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यांनी चोराचा पाठलाग केला.त्याच वेळी पोलीस कॉन्स्टेबल वंजारे यांनी घटनास्थळी येत गस्तीवर असलेले कणकवली पोलिस निरीक्षक बापू खरात यांना पाचारण केले. परंतु चोर पलायन करण्यात यशस्वी झाले. अजित नाडकर्णी यांचे घरातील सी सी कॅमेरा हि चोरांनी पळविला. नाडकर्णी उपचारासाठी कोल्हापूरला असल्याने घरात कोणीही नव्हते.

तत्पूर्वी मंदिराच्या मागे पवार यांचे घर कोणी नसल्याने चोरांनी फोडले, तर भरवस्तीत बाजारपेठेतील प्रदीप तावडे यांच्या दुकानाचे रेलिंग उचकटून फोडले व चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. मात्र फोंडाघाट व्यापारी संघाने आठवड्यापूर्वीच दुकानात कॅश अथवा मौल्यवान वस्तू ठेवू नयेत, असे आवाहन केल्यामुळे त्यांना केवळ सुट्ट्या चिल्लर वरच आपले समाधान मानावे लागले.

रात्रीच्या घरफोडीच्या घटनेचा क्रम पाहतात ग्रामस्थांनी रात्र दोन व चार वाजता पोलिसांकडून गस्त घालण्याची आग्रही मागणी होत आहे.गावांमध्ये अनोळखी व्यक्ती फिरताना आढळल्यास चौकशी करून पोलिसांना कळविण्याचे निर्देश फोंडाघाट व्यापारी संघ व ग्रामपंचायत द्वारे देण्यात आले आहेत. एसबीआय बँके जवळ व एसटी स्टँड वरील सी सी कॅमेरे चा टुलबॉक्स उघडा असल्याने, यामध्ये छेडछाड केल्याचा संशय व्यक्त होत आहे, तर चोरटे चोरी पूर्वी माहिती घेऊनच चोरी करत असल्याचे, घटनाक्रमावरून स्पष्ट होत आहे. फोंडाघाट आउट पोस्टला ज्यादा पोलीस देतो म्हणून, अधिकारीवर्ग चक्क बैठकीच्या वेळी सांगतात. परंतु अद्यापही दोन कॉन्स्टेबलवर दशक्रोशीचा गाडा हाकला जातोय. त्यामुळे घटनेचे वेळी पोलीस उपलब्ध होऊ शकत नाहीत. याची तातडीने नोंद घेऊन ज्यादा पोलीस कायमस्वरूपी द्यावा अशी आग्रही मागणी होत आहे.

एसटी स्टँड वर वाहनचालकांना संपामुळे वाहनतळाची सवय लागल्याने रात्रीचे वेळी ओळखीच्या वाहनांसह, अनोळखी वाहने सुद्धा एसटी स्टॅन्ड आवारात पार्क केली जातात. हे सुद्धा अनैतिक उद्योगाचे कारण होऊ शकते. याकडेही एसटी प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. त्यामुळे भीतीदायक परिस्थिती उद्भवलेल्या फोंडाघाट परिसरातील घरफोडीचा तपास, पोलिस यंत्रणा कशी करते ? व चोरांना पकडण्यात कशी यशस्वी ठरते ? हाच औतसूक्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + 14 =