You are currently viewing डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार

डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार

*डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार*

*गडचिरोलीतील आरोग्यसेवेसाठी समर्पित कार्याचा गौरव*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

“महाराष्ट्राला मद्यनीती आणि तंबाखूमुक्तीची तातडीची गरज आहे,” असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक आणि आरोग्य संशोधक डॉ. अभय बंग यांनी केले. वैद्यकीय क्षेत्रातील जागतिक स्तरावर प्रतिष्ठित संशोधन करणाऱ्या डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग यांना सन २०२४ चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण यांच्या ११२व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. अभय बंग म्हणाले, “समाजाच्या प्रश्नांवर संशोधन करून उपाय शोधण्याचे कार्य आम्ही गडचिरोलीत सुरू केले. दारूबंदीची मागणीही जनतेतूनच आली आणि आम्ही शासनाकडे त्याचा पाठपुरावा केला. आमच्या कार्याचे खरे श्रेय आदिवासी जनतेलाच जाते.”

गडचिरोलीतील आरोग्य सेवेपासून महिलांच्या सक्षमीकरणापर्यंत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या दांपत्याच्या योगदानाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. ‘सर्च’ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गडचिरोलीसारख्या नक्षलप्रभावित भागात मूलभूत आरोग्यसेवा पोहोचवल्या आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव करताना त्यांना रुपये पाच लाख, मानपत्र, शाल आणि स्मृतिचिन्ह अशा स्वरुपाचा पुरस्कार देण्यात आला. मुंबईतील महात्मा गांधी फाउंडेशनच्या बुक डेपोच्या कार्यासाठी त्यांनी हा निधी देऊ केला.

पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष विख्यात अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी बंग दांपत्याच्या संशोधनकार्याची माहिती उपस्थितांसमोर मांडली. डॉ. काकोडकर म्हणाले, “बालमृत्यू, न्यूमोनिया आणि आदिवासी आरोग्यासंबंधी डॉ. बंग यांनी केलेले संशोधन अभूतपूर्व आहे. त्यांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी आहे.”

यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी बंग दांपत्याच्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक करताना सांगितले, “चव्हाण साहेबांच्या समाजसेवेचा वसा डॉ. राणी आणि डॉ. अभय बंग पुढे नेत आहेत. त्यांच्या कार्याने गडचिरोलीतील आरोग्य आणि जनजागृतीमध्ये आमूलाग्र बदल घडला आहे.”

यावेळी ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ या मराठी पुरस्काचा अनुवाद असलेल्या ‘माय एनलायटेनिंग हार्ट डिसिज” या डॉ. अभय बंग लिखित ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच डॉ. राणी बंग प्रकृती अस्वास्थ्यामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहू शकल्या नसल्या तरी त्यांनी दृक्श्राव्य माध्यमातून पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यशवंतराव चव्हाण सेंटरचे उपाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी स्वागतपर भाषणात संस्थेच्या तीन दशकांच्या कार्याचा आढावा घेतला. केंद्राचे सरचिटणीस हेमंत टकले यांनी पुरस्कार मानपत्राचे वाचन केले. याप्रसंगी निवड समितीचे सदस्य विवेक सावंत, तसेच चव्हाण सेंटरच्या कोषाध्यक्ष अदिती नलावडे, चव्हाण सेंटरचे विश्वस्त दिलीप वळसे पाटील, जीवनराव गोरे, श्री. बी. के. अगरवाल, जयराज साळगावकर, फरीदा लांबे, माजी महापौर विधी सल्लागार निर्मला सामंत-प्रभावळकर, प्रकाशक रामदास भटकळ चव्हाण सेंटरचे पदाधिकारी, इतर सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ यांनी केले. राष्ट्रगीताने समारोप झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा