You are currently viewing तो अवचित आला तेव्हा…

तो अवचित आला तेव्हा…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*तो अवचित आला तेव्हा…*

 

तो अवचित आला तेव्हा, मी उन्हात होते बसले

सडसडला अंगावरती, अन् उन्हात चांदणे हसले..

 

शिरशिरी ती थरार आली, मी सर्वांगे मोहरले

वाटले मला जर्रा….से, कल्पनेत मी थरथरले…

 

तो मोती पेरत आला,

मी भाळी माळत होते,

अन् जन्मोजन्मीचे होते…

अहो, त्याचे माझे नाते…

 

मी कुंतल झटकत होते भांगावर पेरत मोती चांदण्या जणू अवतरल्या, अंगणी लावल्या जोती…

 

नक्षत्रे घेऊन आला,

मी तशीच झेलत, झोले

खदखदा ऊन्हात तो हसला,

सर्वांग भिजवले ओले…

 

किती वेचू माणिकमोती, का वेड लावले मजला

वाऱ्यावर विहरत होता, तो ऊनचांदणं, रूजला..

 

भिजवून तो मजला गेला,गेला विरहार्त ठेवूनी

अजूनही मनात का पेटे,अवचित तयाची धुनी…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा