ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान यांचे प्रतिपादन..
बांदा :
हृदयाला भिडणारी भाषा ही मातृभाषा असते, आणि सर्व भाषात मराठी ही परिपूर्ण भाषा आहे.मराठी भाषा टिकविण्यासाठी ती बोलायला हवी, वाचायला हवी, लिहायला हवी. मराठीचा प्रचार प्रसार करण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान यांनी येथे केले.
बांदा येथील नट वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात श्री खान बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष एस आर सावंत, उपाध्यक्ष नीलेश मोरजकर, कार्यवाह राकेश केसरकर, अनंत भाटे, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, संचालक प्रकाश पाणदरे, बांदा केंद्रशाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर, महिला संचालिका सौ. स्वप्नीता सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी अनंत भाटे,शांताराम असनकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थी नैतिक मोरजकर, दुर्वा नाटेकर, ज्येष्ठ महिला अर्चना सावंत, शिक्षिका दिक्षा नाईक, सुनील नातू यांच्यासह विद्यार्थ्यांनी ‘माझ्या आठवणीतील कविता’ सादर केल्यात.
यावेळी राजेश्वरी बांदेकर,ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू, अमिता परब आदिसह विद्यार्थी, पालक,शिक्षक व वाचक उपस्थित होते.यावेळी वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन मांडण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.