पुणे :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाच्या *डॉ. जयकर व्याख्यान* मालेत शिरूर येथील सि.टी. बोरा या प्रसिद्ध कॉलेजमध्ये ज्येष्ठ साहित्यिक , भावकवी यांचे *मराठी साहित्यिकांच्या सहवासात या विषयावर व्याख्यानाचे आयोजन 24 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मा. के.सी मोहिते सर होते.
व्याख्यानाचे केंद्र कार्यवाह आणि मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. बाळकृष्ण लळीत सर यांनी प्रास्ताविक केल्यानंतर प्राचार्य डॉ. के.सी मोहते यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
व्याख्याते मा. वि.ग. सातपुते यांनी आपल्या ओघवत्या शैलीमध्ये ” मला अगदी प्राथमिक शालेय जीवनापासून अनेक उत्तम शिक्षकांचा सहवास लाभला जसे बिंदुमाधव गुरव , प्राचार्य स्व. दा.सी. देसाई , डॉ. द.ता.भोसले , प्रा. बळवंत देशमुख अशा अनेक प्रभृतींचा सहवास लाभला आणि मी घडत गेलो. 1963 साली डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश शाळेत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शाळेतर्फे स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली तेंव्हा स्व.आचार्य अत्रे यांचा मला 3 दिवस सहवास लाभला हे माझे परमभाग्य आहे. त्यावेळी त्यांनीच माझे संक्षिप्त नाव ” *विगसा* ठेवले याचा मला अभिमान आहे. त्यावेळी अनेक ज्येष्ठ साहित्यिक / कवी यांना मला जवळून पहाता आले त्यात स्व. दत्तोवामन पोतदार , लोककवी मनमोहन नातू , बॅरिस्टर न.वि गाडगीळ , श्री.के क्षीरसागर , शिवाजीराव भोसले. शाहीर अमर शेख , शाहीर साबळे , गोविंद स्वामी आफळे , शांताबाई शेळके , श्री व सौ. बॅरिस्टर पी.जी. पाटील , स्व. वि.वा. शिरवाडकर ( तात्या ) असे अनेक साहित्यिक भेटले या सहवासातून मी लिहू लागलो हे मात्र खरे .! या सर्वांचा मी ऋणी आहे. त्यांच्या अनेक आठवणी आजही मनात घर करून आहेत.
या साऱ्या प्रवासात मी लिहू लागलो आणि आजपर्यंत माझी 39 पुस्तके प्रकाशित आहेत आणि मला या पुस्तकांना स्व. शांताबाई शेळके , प्रा. बळवंत देशमुख, डॉ. द.भी. कुलकर्णी , डॉ. न. म. जोशी अशा मान्यवरांच्या प्रस्तावना लाभल्या आहेत हे मी माझे भाग्य समजतो.
पुढे ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक डॉ. द.भी. कुलकर्णी , आनंद यादव , वि. भा. देशपांडे , गुरुवर्य डॉ. न.म. जोशी , डॉ. अशोक कामत, डॉ. महेंद्र ठाकुरदास , प्रा. सु. द. वैद्य , अशा नामवंत विचारवंतांचा मला सहवास लाभला आणि त्यातून आज साहित्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेली *महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे* या संस्थेची स्थापना झाली असून ती आज सर्वत्र काम करते आहे. असे सांगून साहित्यिकांच्या अनेक आठवणी आपल्या भाषणातून सांगितल्या .
नवोदित साहित्यिकांनी नित्य वाचन , मनन , चिंतन करून प्रस्थापिक साहित्यिकांच्या सहवासात जरूर रहावे…आणि ” लिहीत रहा …लिहीत रहा….!! असे सुचविले.
या प्रसंगी सी.टी. बोरा कॉलेज शिरुरचे अनेक विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते. तसेच प्रा.राजाभाऊ भैलुमे , डॉ. ईश्वर पवार , डॉ. जोशी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. क्रांती शेलार यांनी केले आणि आणि डॉ. ईश्वर पवार यांनी आभार मानल्या नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.