कोणी बोलावं बबन साळगावकरांवर?

कोणी बोलावं बबन साळगावकरांवर?

संपादकीय…..

सावंतवाडीचे नगरसेवक ते नगराध्यक्ष अशी विविधपदे भूषवित जवळपास ४० वर्षे राजकारण केलं, परंतु राजकीय निर्णय घेताना झालेल्या गफलतीमुळे सावंतवाडीचे नगराध्यक्ष पद सोडून विधानसभेच्या रिंगणात आपले नशीब आजमावण्याकरिता उतरलेले बबन साळगावकर हे एकमेव राजकीय नेते नसून, आपली हयात राजकारणात घालवल्यानंतर कित्येकजण उच्चतम पातळीवर काम करण्यास इच्छुक असतात. बबन साळगावकरांनी सुद्धा तेच केलं त्यात चुकीचं काही नव्हतं. परंतु बबन साळगावकरांनी आपली संपूर्ण कारकीर्द भ्रष्टाचाराचे गालबोट न लावता पूर्ण केली आहे. सावंतवाडी शहराच्या विकासासाठी ते कायम झटले आहेत. नगरपालिकेचे काम असतानाच नगराध्यक्षांसाठी असलेलं वाहन वापरायचे, इतरवेळी मित्रांच्या दुचाकीवरूनच नगरपालिकेमध्ये यायचे. त्यामुळे नगरपालिकेच्या पैशांचा अथवा पदाचा त्यांनी कधीही दुरुपयोग केलेला नसून त्यांची कारकीर्द स्वच्छ राहिली होती.
बबन साळगावकरांनी नगराध्यक्षांवर केलेल्या टिकेनंतर बबनरावांची कुंडली बाहेर काढू, त्यांची कृत्ये बाहेर काढली तर त्यांना सावंतवाडी सोडावी लागेल अशी टिपण्णी केली. ज्या व्यक्तीने आपल्या राजकीय कारकिर्दीत कुठलाही भ्रष्टाचार केला नाही, गाड्या, बंगले उभारले नाहीत किंवा प्रॉपर्टी केली नाही, त्या व्यक्तीवर बोलावं तर कुणी? दुसऱ्यांवर बोट दाखवताना लोक स्वतःचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ देखील विसरतात. दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना चार बोटे आपल्याकडे वळलेली असतात याची जाणिव माणसांना नसतेच. आपला व्यवसाय काय, आपले धंदे कोणते? आपली कुंडली शहर वासीयांना ज्ञात आहे की नाही याची कसलीही तमा न बाळगता माणूस वरिष्ठांना खुश करण्यासाठी वाट्टेल तसे वक्तव्य करतो परंतु इतरांनी आपला इतिहास आणि वर्तमान तपासून पाहिल्यावर तोंडघशी पडण्याची वेळ येते, अशीच परिस्थिती बबन साळगावकारांची कुंडली आणि कृत्ये बाहेर काढणाऱ्यांची होणार यात शंकाच नाही.
आपल्या राजकीय कारकिर्दीत अवैध मार्गाने पैसा न कमावलेले बबनराव कोरोनाच्या काळात उपासमारीची वेळ आलेल्यांना कुठून मदत करणार? ज्यांच्याकडे इतर मार्गांनी पैसा येतो तेच पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी देखावे करतात. बबनराव आणि केसरकर वादात केसरकरांनी बबनरावांवर टीका केली नाही परंतु विरोधक मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचं भांडवल करताना दिसत आहेत. बबनरावांनी रवी जाधव यांचे पुनर्वसन केले नसेलही, परंतु त्यांचं पुनर्वसन करण्याची नामी संधी सत्ताधाऱ्याकडे असताना, त्याचा परवानगी घेऊन तात्पुरता उभारलेला स्टॉल काढून, त्यातील सामान कचऱ्याच्या गाडीतून भरून नेण्याचा पराक्रम करणारे, परप्रांतीयांना गाळे देऊ शकतात, मटक्याच्या अनधिकृत टपऱ्या उभारायला देऊ शकतात, मग रवी जाधवांसाठी वेगळा न्याय का?
बबन साळगावकरांवर पलटवार करण्यापेक्षा आपल्या कारकिर्दीत किती लोकांवर अन्याय झाला, किती लोक बेरोजगार झाले, भाजीवाले, स्थानिक गोरगरीब व्यापारी का प्रशासनाच्या विरोधात उभे ठाकले? या सर्व बाबींचा विचार करून आपल्या कार्यपद्धतीमध्ये सुधार आणून सावंतवाडी शहराच्या विकासासाठी प्रयत्न करणे हितावह वाटते.

प्रतिक्रिया व्यक्त करा