राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देण्यासाठी पात्र व्यक्ती व संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळकृष्ण परब यांनी दिली आहे.
व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा व संस्थांचा गौरव करण्यात यावा तसेच व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यकरीत असलेल्या कार्यकर्ते व संस्थांच्या कार्याला दाद द्यावी व इतर कार्यकर्त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी जेणेकरून व्यसनमुक्ती कार्याच्या उत्थानासाठी कार्यकर्ते सरसावून पुढे यावेत या व्यसनमुक्ती प्रचार कार्याचा दर्जा वाढविताना सर्वसमावेशकता निर्माण करणे, त्यायोगे पात्र व्यक्ती व संस्था यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी सन 20-21, सन 21-22 सन 23-24 व सन 24-25 या पाच वर्षाकरिता व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांच्याकडून राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. व्यक्ती व संस्थांनी प्रत्येक वर्षासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे.
व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीला रुपये 15,000/- तर संस्थेस रुपये 30,000/- तसेच सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, एक शाल किंवा साडी, खण आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यासाठी नियमावली व विहित नमुन्यातील अर्ज याबाबतची माहिती https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज स्वीकारण्याची मुदत दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत असून सदरचे प्रस्ताव समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे सादर करावेत विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, अधिक माहितीकरीता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा दुरध्वनी क्र. 022-22025251, 220208660 वर संपर्क साधावा.
व्यसनमुक्ती कार्यात सहभागी असलेल्या व्यक्ती व संस्था यांनी या पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस व समाज कल्याण अधिकारी बाळकृष्ण परब यांनी केले आहे.