You are currently viewing आपल्या सुरक्षेसाठी असलेल्या वाहतूक नियमांचे पालन करा

आपल्या सुरक्षेसाठी असलेल्या वाहतूक नियमांचे पालन करा

न्या. डी बी म्हालटकर यांचे आवाहन : रस्ता सुरक्षा अभियान

सिंधुदुर्गनगरी

शासनाचा रस्ता सुरक्षा अभियान हे सर्वांच्या सुरक्षेसाठी आहे. वाहतूक शाखा व आरटीओ कर्मचारी केवळ आपला महसूल गोळा करण्यासाठी कारवाई करत नाहीत. ते वाहन चालकाची सुरक्षिततेला महत्व देत असतात. त्यामुळे वाहन चालकांनी आपल्याला दंड भरावा लागणार आपल्यावर कारवाई होणार या भीती पोटी वाहतूक नियमांचे पालन न करता वाहतूक नियम हे आपल्या सुरक्षेसाठी आहेत म्हणून त्यांचे पालन करा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव न्या. डी बी म्हालटकर यांनी ओरोस फाटा येथे आयोजित रस्ता सुरक्षा अभियानात मार्गदर्शन करताना केले. शासनाच्या वतीने जिल्ह्यात १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत ३२ वे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे यांच्या वतीने ओरोस फाटा येथील बॉक्सवेल येथे रिक्षा चालक, वाहन चालक आणि नागरिक यांच्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव न्या. डी बी म्हालटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी जिल्हा पोलिस उप अधीक्षक (गृह) संध्या गावडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत, सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश भोसले, रिक्षा चालक, नागरिक आदी उपस्थित होते. यावेळी वाहतूक नियमांबाबत उपस्थित वाहन चालकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना वाहतूक नियम मार्गदर्शन पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. यावेळी माहिती देताना आरटीओ राजेंद्र सावंत यांनी सांगितले की, राज्यात होणारे अपघात हे वाहतूक नियम मोडल्याने होत आहेत. त्यात रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी शासन दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबवित आहे. “मृत्यूशी टाळायची असेल भेट तर दुचाकी चालवताना घाला हेल्मेट” हे ब्रीद वाक्य यावर्षी निश्चित करण्यात आले आहे. तसेच कारवाई करणे हा विभागाचा हेतू नसून वाहतूक नियमांचे पालन व्हावे हा हेतू आहे. असे सांगतानाच वाहन चालकांनी महामार्गावर शॉट कट मार्गाचा वापर न करता ज्या ठिकाणी क्रॉसिंग आहे अशाच ठिकाणी वळसा घालून निश्चित ठिकाणी जावे असे आवाहन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 5 =